आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Build Ministry Building Rather Than Repairing Old

डागडुजीऐवजी नवे मंत्रालय बांधले असते, तर पैसा वाचला असता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मंत्रालयाला आग लागल्यानंतर डागडुजी करण्याऐवजी पूर्ण इमारत पाडून नव्याने बांधली असती, तर शासनाचा पैसा आणि वेळेची बचत झाली असती, असे स्पष्ट मत मंत्रालयाचे आर्किटेक्ट राजा अडिरे यांनी खास ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.


मंत्रालयाला आग लागण्यापूर्वीच दोन वर्षांपूर्वी अडिरे यांनी मंत्रालयाच्या नूतनीकरणाचा आराखडा सार्वजनिक बांधकाम खात्याला सादर केला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ या कामासाठी तयार होते, परंतु मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. गेल्या वर्षी आगीत चौथा, पाचवा आणि सहावा मजला पूर्णपणे नष्ट झाला होता. त्यानंतर नूतनीकरणाची योजना आखली आणि जागतिक पातळीवरील प्रख्यात आर्किटेक्ट राजा अडिरे यांचा आराखडा मंजूर करण्यात आला. युनिटी कन्स्ट्रक्शनला बांधकामाचे कंत्राट देण्यात आले.


अडिरे म्हणाले, आगीमुळे वरचे तीन मजले पूर्णपणे नष्ट झाले होते. आगीमुळे भिंतीनाही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन आराखडा तयार करण्यात आला. अगोदरचे पिलर्स आणि कॉलम ठेवूनच आम्हाला नव्याने रचना करावी लागली. त्यामुळे काही अडचणी आल्या. आता नवे मंत्रालय प्रशस्त, हवेशीर असणार आहे. मात्र, पूर्ण इमारत पाडून नव्याने बांधली असती, तर राज्य सरकारचा पैसा आणि बांधकामाचा वेळ नक्कीच वाचला असता.


स्वच्छतागृहाची अवस्था वाईट
पूर्वीचे मंत्रालय खूपच कोंदट होते. टॉयलेटची अवस्था तर भयानक होती. त्यामुळे टॉयलेटमध्ये कोणी जातही नव्हते. संसदेच्या टॉयलेटची अवस्थाही अत्यंत वाईट आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी दहा बारा लिटर फिनेल तेथे ओतले जाते. टॉयलेट खरे तर चांगले असावयास हवे. मंत्रालयात आम्ही या गोष्टीवर जास्त लक्ष दिले आहे. संपूर्ण सात मजले तयार झाल्यानंतर संपूर्ण देशात आपल्या मंत्रालयाची वास्तू देखणी म्हणून ओळखली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.