आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Builder Amar Bhatia Not Accidental Death, He Is Suicide

अमर भाटियांनी आत्महत्या केल्याचा संशय, परमार प्रकरणाचा दुसरा अंक?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मोहन ग्रुप या बांधकाम समूहाचे संचालक अमर भाटिया यांचा शनिवारी मध्यरात्री रेल्वेची धडक बसून मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र, हा अपघात किंवा घातपात नसून भाटिया यांनीच आत्महत्या केल्याचे आता हळूहळू पुढे येऊ लागले आहे.

भाटिया यांचा शनिवारी रात्री अंबरनाथ व बदलापूर या रेल्वे स्थानकादरम्यान बेलवली येथील एका भुयारी मार्गावर त्यांचा मृतदेह आढळून आला होता. पुण्याकडे जाणा-या दुरान्तो एक्स्प्रेसच्या धडकेने मृत्यू झाल्याचे व हा अपघात असल्याचे सांगितले गेले मात्र प्रत्यक्षात ही आत्महत्या असल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगरमध्ये राहणारे अमर भाटिया यांच्यासारखा बिल्डर एवढ्या मध्यरात्री रेल्वे लोहमार्गावर आणि एकटाच कशाला जाईल याची चौकशी पोलिसांनी सुरू केल्यानंतर ही बाब पुढे आली आहे. दरम्यान, हे प्रकरण म्हणजे ठाण्यातील सूरज परमार या प्रकरणाचा दुसरा अंक असल्याची चर्चा सुरु झाली आहे. भाटिया यांचे अंबरनाथ-बदलापूर पट्ट्यात अनेक बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. तसेच बदलापूर नगरपालिकेतील काही अधिकारी भाटियांच्या प्रकल्पात अडचणी आणत होते. यामुळे भाटिया यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दाव्याला दुजोरा देणारे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने आज दिले आहे.
या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या बांधकाम प्रकल्पाबाबत अनेक अडचणी आहेत, त्या सोडवल्या जाव्यात अशा आशयाचे पत्र अमर भाटिया यांनी ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांना दिले होते. याची दखल न घेतल्यास आपण आत्महत्या करू असेही भाटियांनी पत्रात नमूद केले होते. यासोबतच भाटियांनी आपल्या नातेवाईकांना फोन करून माझ्या मुलीची काळजी घ्या असे सांगितले होते.
भाटिया हे मागील काही दिवसापासून नैराश्यात असल्याचे त्यांच्या फेसबुक स्टेट्सवरून दिसून येते. शुक्र करो कि दर्द सहते हैं, लिखते नहीं....!! वर्ना कागजों पे लफ्जों के जनाजे उठते....!! असे त्यांनी महिन्याभरापूर्वी फेसबुकवर स्टेट्स टाकले होते. त्यामुळे वरील सर्व घटनांची व्याप्ती पाहता अमर भाटिया यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे.