आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परमार प्रकरण : आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत चार नगरसेवकांची नावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी एक खळबळजनक खुलासा झाला आहे. परमार यांच्या आत्महत्येसाठी ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांचा दबाव कारणीभूत ठरल्याची बाब न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाद्वारे उघड झाल्याची माहिती पोलिस दलातील खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. याबाबत पोलिसांनी अद्याप कोणताही अधिकृत खुलासा केला नसला, तरी या खुलाशामुळे ठाणे शहरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनीही न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार तपासाला वेग दिला आहे.

ठाण्यातील कॉसमॉस ग्रुपचे सूरज परमार यांनी काही दिवसांपूर्वी व्यावसायिक वादाला कंटाळून आत्महत्या केली होती. राजकीय जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहून ठेवले हाेते. आपल्याला त्रास देणार्‍या सहा राजकीय व्यक्तींची नावेही परमार यांनी या चिठ्ठीत लिहिल्याचे पाेलिस तपासात समाेर आले आहे. मात्र, नंतर ‘ही नावे लिहिल्याने आपल्या कुटुंबाला त्रास होईल’, असे त्या चिठ्ठीतच नमूद करतानाच परमार यांनी स्वत:च ही नावे खोडली होती. ही खोडलेली नावे नेमकी कोणाची आहेत, हे तपासण्यासाठी परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ‌्ठी राज्याबाहेरील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात आली होती. या तपासणीचा अहवाल ठाणे पोलिसांना प्राप्त झाला असून यापैकी चार नावे ही ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी दोन नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून एक नगरसेवक मनसे आणि एक काँग्रेसचा असल्याची माहिती पोलिस विभागातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात दाेषींवर कठाेर कारवाई करण्यासाठी मुंबई- ठाण्यातील बिल्डरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडेही घातले हाेते.

नगरसेवकांच्या कामकाजावर पोलिसांची नजर
ठाण्यातील चार नगरसेवकांनी महापालिकेच्या महासभेत किंवा स्थायी समितीच्या बैठकांमध्ये काॅसमॉस ग्रुपशी संबंधित कोणकोणते मुद्दे मांडले होते. त्यांचा परिणाम म्हणून परमार यांना काही व्यावसायिक नुकसान झाले होते का? या बाबींचा तपास आता ठाणे पोलिस करत असल्याचीही माहिती एका पोलिस अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. त्यातून काही भरीव ठाेस उपलब्ध झाल्यास पोलिस या चार नगरसेवकांची चौकशी करण्याचीही शक्यता आहे. याप्रकरणी लवकरच ठाणे पोलिस पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.