आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरी दुर्घटनाः ठाण्यात इमारत कोसळली; १२ ठार, ६ जणांना वाचवले, आठ तास चालले बचाव कार्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ठाण्यातील नौपाडा भागातील बी केबीन परिसरातील तीन मजली कृष्णा निवास ही इमारत सोमवारी रात्री दोनच्या सुमारास कोसळली. या घटनेत बारा जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिला आणि पाच पुरुषांसह दोन मुलींचाही समावेश आहे. यापैकी चार जण कुटुंबातील होते, तर बचाव पथकांच्या सतर्कतेमुळे सहा जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. आठवडाभरापूर्वीच ठाणे जिल्ह्यातील ठाकुर्ली भागात एक इमारत कोसळून ९ जणांचा बळी गेला होता.

बी केबीन परिसरात असलेली तीन मजल्यांची ही इमारत सन १९६३ साली बांधण्यात आली होती. विशेष म्हणजे ही इमारत अतिधोकादायक किंवा धोकादायक इमारतींच्या यादीतही नव्हती. या इमारतीत पागडी पद्धतीने लोक राहत होते. पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावर प्रत्येकी दोन कुटुंबे वास्तव्यास होती. सर्वजण झोपेत असतानाच इमारत पडल्याने मृतांची संख्या वाढली. रात्री दुर्घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबतच वीज वितरण महामंडळ, अग्निशमन यंत्रणा आणि पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही या बचाव कार्यात मोलाची मदत केली. जखमींना ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. साडेआठ तास चाललेले हे बचाव कार्य सकाळी साडेदहाच्या सुमारास संपले.

५० जवानांचे बचाव कार्य
पहाटे सव्वाचारच्या सुमारास एनडीआरएफचे ५० जवान घटनास्थळी अाले. श्वानपथक, लाइव्ह डिटेक्शन व व्हिक्टिम लोकेशनच्या साहाय्याने त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेतला. अवघ्या अर्ध्या तासातच सहा जणांचे प्राण वाचविले. तळमजल्यावर पटेल यांचे चहाचे दुकान असल्याने त्यांच्या घरात सात सिलिंडर होते. ते वेळीच बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आल्याने धोका टळला.

क्लस्टर डेव्हलपमेंटच्या वादातील इमारत
कृष्णा निवास इमारत असलेल्या परिसराचा समूह विकास केला जाणार आहे. या इमारतीच्या शेजारी असलेली कमळ भवन ही इमारत दोन महिन्यापूर्वीच ठाणे महापालिकेने पाडली. तसेच आजूबाजूच्या इतर इमारतींना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, जोपर्यंत आपल्याला योग्य अशी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नाही तोपर्यंत इमारत खाली करणार नसल्याची भूमिका या इमारतीमधील रहिवाशांची व्यक्त केली होती.

मायलेकींचा मृत्यू
या इमारतीतल सावंत कुटुंबीयांच्या नातीचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या अमित खोत यांची पत्नी आशा आणि त्यांची सात वर्षांची मुलगी अनन्या या मायलेकींचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.

अन‌् मांजर बचावली !
या इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या माधव बर्वे यांनी पाळलेली एक मांजर मात्र आश्चर्यकारकरीत्या बचावली आहे. ढिगारा उपसताना ती बचाव पथकाला मिळाली. संपूर्ण रात्रभर ही मांजर आपल्या मृत मालकाच्या मृतदेहाशेजारी बसून होती, अशी माहिती या बचाव पथकातील जवानांनी दिली.

मृतांत एकाच कुटुंबातील चौघे
सुबराव पांडुरंग भट (वय ५४), रामचंद्र पांडुरंग भट (५०), मीरा रामचंद्र भट (५०), रुचिता रामचंद्र भट (२५), अरुण दत्तात्रय सावंत (६२), अमित अरुण सावंत (४०), भक्ती अमित खोत (२४), अनन्या अमित खोत (५), प्रिया अमृतलाल पटेल (१४), रश्मी करण मांगे (२५), मंदा अरविंद नेने (७०), माधव रामचंद्र बर्वे (६०) अशी मृतांची नावे अाहेत.

यह बिल्डिंग गिरेगी
तो नहीं ना..!
सोमवारी या इमारतीच्या तळमजल्यावर दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याच वेळेस दुपारी दोनच्या सुमारास या इमारतीचा काही भाग कोसळला,तर संध्याकाळी पाच वाजता इमारतीच्या बाहेरील भागाच्या प्लास्टरचा काही भाग कोसळला होता, अशी माहिती दुर्घटनेत बचावलेल्या अमृतलाल पटेल या चहावाल्याने दिली. विशेष म्हणजे रात्री जेवणानंतर आपल्या शेजारी राहणाऱ्या माधव बर्वे यांच्याशी गप्पा मारतानाही अमृतलाल यांनी ‘बिल्डिंग गिरेगी तो नहीं ना’ अशी भीती व्यक्त केली होती. दुपारी काही भाग कोसळल्यानंतर लगेचच महापालिका प्रशासनाला त्याची माहिती दिली असती तर कदाचित ही दुर्घटना टळली असती.
बातम्या आणखी आहेत...