आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Buisnessman Sanjay Kakade File Form For Rajyasabha

राज्यसभा निवडणूक: सातव्या जागेसाठी बिल्डर संजय काकडे रिंगणात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ पुणे - पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांनी राज्यसभा निवडणुकीतील सातव्या जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून गुरुवारी अर्ज दाखल केला. दोन वर्षांपूर्वी राज्यसभेसाठीच अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या काकडे यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या दुस-या उमेदवाराच्या तोंडाला फेस आणला होता. हा उमेदवार पराभूत होईल, असे वाटत होते. मात्र, शेवटच्या क्षणी राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समजूत काढल्यानंतर काकडे यांनी माघार घेतली. या वेळी मात्र ते सर्व ताकदीनिशी उतरले आहेत.
यापूर्वी मार्च 2012 मध्येही तारिक अन्वर व वंदना चव्हाण यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. तारिक अन्वर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, काकडेंमुळे वंदना चव्हाण पराभूत होतील अशी स्थिती होती. शेवटच्या क्षणी शरद पवार यांनी काकडे यांना बोलावून त्यांची समजूत घातल्याने चव्हाण यांचा पराभव टळला. या वेळी काँग्रेस व राष्‍ट्रवादीकडून प्रत्येकी दोन उमेदवारांचे विजय निश्चित समजले जात आहेत. तसेच शिवसेना व
भाजपचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल. प्रश्न सातव्या जागेचा असून या जागेसाठी अद्याप कुठल्याच पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. या वेळी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काकडे यांनी राष्‍ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केल्याचे समजते.
जैस्वाल, प्रशांत बंब पाठीशी
सातव्या जागेसाठी आर्थिक ताकद असलेला उमेदवार विजयी होईल, असे बोलले जाते आणि ही काकडे यांची जमेची बाजू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्‍ट्रवादी, भाजप व शिवसेना यांनी अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही आणि तो जाहीर केला जाईल अशीही स्थिती नाही. गुरुवारी काकडे यांनी अर्ज भरला तेव्हा अपक्ष आमदारांनी समर्थक म्हणून अर्जावर सह्या केल्या. यात प्रशांत बंब, रवी राणा, गिरीश कोतवाल, सीताराम घनदाट, बळीराम शिरसकर, सुरेश जेथलिया, बच्चू कडू, प्रदीप जैस्वाल, अमित बोंडे, हरिदास भादे यांचा समावेश आहे. यापैकी हरिदास भादे हे भारिप बहुजन महासंघाचे असून प्रदीप जैस्वाल हे अपक्ष असले तरी ते शिवसेना समर्थक आहेत.
*सर्वच राजकीय पक्षांत काकडेंची मैत्री
घोडेबाजार तेजीत
राष्ट्रवादी काँग्रेसशी विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सलगी असलेल्या संजय काकडे यांचे भाजप-शिवसेनेतदेखील अनेक मित्र आहेत. त्यामुळे कॉँग्रेस, राष्‍ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे व अपक्ष आमदारांची मोट बांधून खासदारकी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. काकडे यांच्यासारखा धनाढ्य उमेदवार या स्पर्धेत समर्थपणे आपले ‘कौशल्य’ पणाला लावू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राज्यसभेचे गणित..
राज्यसभेचा खासदार होण्यासाठी पहिल्या पसंतीची 36 मते मिळवणे आवश्यक आहेत. संख्याबळ ८2 असलेल्या काँग्रेसचे दोन उमेदवार सहज विजयी होतील. त्यांची दहा मते शिल्लक राहणार आहेत. ‘राष्ट्रवादी’चे 62 आणि ९ अपक्ष समर्थक आमदार यांच्या जोरावर शरद पवार आणि माजिद मेनन विजयी होतील. भाजप आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार सहज निवडून आल्यावरही युतीकडे 17 मते अतिरिक्त उरतात. युती, मनसे आणि अपक्षांची मोट बांधून 36 चा आकडा गाठण्यासाठी काकडेंचे प्रयत्न सुरू आहेत.