आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा म्हणाले, मोदींवर विश्वास ठेवावा, तर गोदरेज यांनी हिंदुत्ववादी तत्त्वांची चिंता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय उद्योग क्षेत्रातील दोन दिग्गज उद्याेगपतींनी शुक्रवारी मोदी सरकारला दोन महत्त्वपूर्ण सल्ले दिले. रतन टाटा आणि गोदरेज या दोन दिग्गजांनी दोन वेगवेगळ्या प्रकारची मते मांडली आहेत. उद्योग जगताचा नव्या सरकारप्रति इतक्या लवकर मोहभंग व्हायला नको. पंतप्रधान मोदी यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी त्यांना वेळ द्यायला हवा. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा, असे रतन टाटा म्हणाले, तर मागच्या काही दिवसांत चर्चवर झालेल्या हल्ल्यांबाबत आदि गोदरेज यांनी चिंता व्यक्त केली आहे. सरकारने अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवायले हवे, नाही तर गुंतवणूकदारांचे मतपरिवर्तन होऊ शकते, असे ते म्हणाले.
मोदींना पाठिंबा द्यायला हवा : रतन टाटा
मुंबईच्या इंटरनॅशनल स्कूल आॅफ बिझनेस बोकोनीच्या दीक्षांत समारंभादरम्यान रतन टाटा म्हणाले की, मोदी यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. आताच त्यांची सुरुवात झाली असून त्या आश्वासनांवर अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना वेळ द्यायला हवा. अापल्याला नवे राष्ट्र घडवायचे असेल, तर त्यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. सरकार काम करत नसल्याची धारणा मागच्या सरकारवेळी तयार झाली होती. नव्या सरकारने लोकांमध्ये महत्त्वाकांक्षा जागवली आहे, असेही ते या वेळी म्हणाले.

इतरांचे जीवनस्तर सुधारावेत
दीक्षांत समारोहात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना टाटा म्हणाले, आपले यश किंवा धन स्वत:पुरतेच मर्यादित ठेवू नका. इतरांची सेवा करण्याची ती संधी ठरू शकते. चांगले शिक्षण मिळवण्याची कुवत असल्यामुळे तुम्ही ते साध्य करू शकलात. आपल्या या प्रगतीतून इतरांचे जीवनस्तर सुधारायला हवे. आपली मूल्ये आणि प्रामाणिकपणा कायम जोपासून ठेवा. जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल तेव्हा तुम्हाला त्याचे समाधान मिळायला हवे. ते समाधान संपत्तीपेक्षा जास्त मौल्यवान असेल, असेही टाटांनी या वेळी सांगितले.

अशा घटनांमुळे गुंतवणूकदारांचा स्थैर्यभाव बिघडेल : गोदरेज
एका माध्यमाशी बोलताना आदी गोदरेज म्हणाले की, अति हिंदुत्ववादी दृष्टिकोन असणाऱ्या घटकांवर सरकारने नियंत्रण ठेवायला हवे. अनेक मंत्र्यांनी याबाबत मते मांडली आहेत. पंतप्रधानांनीही त्यांना खडसावले आहे. अशा प्रकारच्या बाबी वाढल्यास अराजकता माजेल. अशा प्रकारच्या भावनेमुळे गुंतवणूकदारांचे स्थैर्यभाव आतापर्यंत बिघडले नाहीत, परंतु अशा प्रकारच्या घटना घडत राहिल्यास ते नक्कीच बिघडू शकते. आर्थिक सुधारणेच्या दिशेने अनेक पावले उचलली गेली. त्यामुळे विकास दर लवकरच उंचावले, अशी अपेक्षाही गोदरेज यांनी या वेळी व्यक्त केली.