आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ बैठक: धनगरांच्या सवलतीत पिचड, वळवींचा खोडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भटक्या विमुक्त प्रवर्गाऐवजी आदिवासींमध्ये धनगर समाजाचा समावेश करण्यात यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. त्यासाठी बारामतीत आंदोलनही सुरू झाले आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड व क्रीडामंत्री पद्माकर वळवी या मंत्र्यांनी मात्र त्याला कडाडून विरोध केला. विधानसभेच्या तोंडावर हा निर्णय घेण्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अनुकूल असताना दोन मंत्र्यांच्या विरोधामुळे मात्र याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत होऊ शकला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

आदिवासींमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाज आता आक्रमक झाला आहे. नुकतीच पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढण्यात आली. तसेच बारामतीत काहींनी उपोषणही सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आघाडी सरकारला तातडीने निर्णय घेण्याची सूचना केली होती. तसा प्रस्ताव सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघेंनी मंत्रिमंडळ बैठकीत आणला. मात्र, धनगर म्हणजे धनगड नव्हे, असे सांगत पिचड यांनी विरोध केला. त्याला वळवींनी पाठिंबा दिला, असे कळते.
एकगठ्ठा मतांसाठी धडपड
मध्य प्रदेशात ‘धनगड’ या नावाने धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे सवलती मिळतात. महाराष्टÑात मात्र तसे होत नाही. राज्यातील सुमारे 22 लोकसभा मतदारसंघांत धनगर समाजाची एक ते दीड लाख मते आहेत. तसेच 48 विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी 35 ते 40 हजार मते आहेत. दक्षिण व पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हे मतदारसंघ येत असल्याने काँगे्रस व राष्टÑवादी धनगरांना सवलत देऊन त्यांची मते वळवण्यासाठी प्रयत्नरत आहे.

रोष टाळण्याची सरकारला घाई
गेल्या बैठकीतही हा विषय चर्चेला आला असताना धनगरांचा समावेश तिसर्‍या अनुसूचित करण्याची शिफारस केंद्राकडे करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, धनगर समाजाने सध्या आक्रमक आंदोलने सुरू केली आहेत. त्यांचा रोष कमी करण्यासाठी या विषयावर पुन्हा विचार करण्यासाठी प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात आला होता. मात्र वळवी व पिचड यांच्या विरोधामुळे त्यावर निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, या प्रकारामुळे बारामतीत आंदोलकांनी सरकारविरोधी तीव्र भावना व्यक्त केल्या.