आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीच्या काळात कंत्राटदारांचे चांगभले, ‘कॅग’चे ताशेरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कोट्यवधी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराने वादग्रस्त ठरलेल्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागाच्या गलथान कारभारावर कॅग अर्थात भारताचे नियंत्रक व महालेखापाल परीक्षक यांच्या अहवालात कडक ताशेरे ओढले आहेत.
मागील सरकारमध्ये छगन भुजबळ आणि सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडील दोन्ही खात्यांकडून कंत्राटदारांवर मेहेरनजर दाखवून अवाजवी फायदा देण्यात आल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. तसेच यापुढील सरकारने नवीन सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) प्रकल्प हाती घेताना अल्प आणि मध्यम मुदतीचा बृहद आराखडा तयार करावा, अशी शिफारसही अहवालात केली आहे.

अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुकवारी विधानसभा आणि विधान परिषदेत कॅगचे अहवाल सादर केले. यातील आर्थिक क्षेत्र अहवाल २०१४ मध्ये बांधकाम आणि जलसंपदा खात्याने राबवलेल्या प्रकल्पातील अनेक त्रुटींवर बोट ठेवण्यात आले आहे. बीओटी तत्त्वावर राबवण्यात आलेल्या रस्ते प्रकल्पांतील उणिवा दाखवत ‘कॅग’ने आघाडी सरकारच्या धोरणाताल उणिवा स्पष्टपणे दाखवल्या.

नाशिकच्या कंत्राटदाराला दोन कोटींची ‘खैरात’
जलसंपदा खात्याने ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात श्रमिक भरपाई विम्याचे अनावश्यक प्रदान केल्यामुळे कंत्राटदाराला १ कोटी ३९ लाख रुपयांचा गैरवाजवी फायदा झाला. नाशिक सिंचन प्रकल्प मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी एका प्रकल्पात कंत्राटाच्या तरतुदींविरुद्ध अतिरिक्त बाब दरसूचीसाठी सुधारित दर मंजूर केले. त्यामुळे कंत्राटदाराला २ कोटी २ लाख रुपये जादा देण्यात आल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.

टोलनाक्यांमध्ये झोल
रस्त्यांच्या रुंदीकरणानंतर टोल बसवण्यात आलेल्या सायन- पनवेल प्रकल्पाचा अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत किमान मूल्य आणि अनुभवांचे निकष शिथिल करण्यात आले. त्यामुळे सरकारने ई-निविदेचा अवलंब करण्याच्या पर्यायाचा विचार करावा. बोली निकषांमध्ये बदल झाल्यास कंत्राट देताना विश्वासार्हता आणि पारदर्शकता आणण्यासाठी पुनर्निविदा मागवण्याबाबत विचार व्हावा, अशी कॅगच्या अहवालात सूचना करण्यात आली आहे. राज्य सरकारने जुलै २००९ मध्ये टोलधोरणात बदल केला. दोन टोलनाक्यांमधील अंतर ३५ ते ४० किलोमीटर इतके असणे आवश्यक होते; परंतु वाशी टोलनाका आणि सायन-पनवेल प्रकल्पातील कामोठे टोलनाका यातील अंतर फक्त १६ किमी होते, याकडे ‘कॅग’ने लक्ष वेधले आहे.