आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरेसा पावसा अभावी छावण्‍या, टँकर्स चालूच राहणार;मराठवाड्यातील धरणे तहानलेलीच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील 277 तालुक्यांत 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असून सहा धरणांच्या साठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, पुरेसा पाऊस पडत नाही तोपर्यंत छावण्या आणि टँकर्स सुरू ठेवण्याबाबत जिल्हाधिका-यांनी अहवाल द्यावा आणि त्यानंतरच टंचाई काळातील सवलती 31 जुलैपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढण्यात येतील, असा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मराठवाड्यातील धरणे मात्र अजूनही तहानलेलीच आहेत.


जुलै महिन्यात राज्यातील पावसाने 144 टक्के इतकी सरासरी गाठली आहे. त्यामुळे जलाशयात सध्या 34 टक्के पाणीसाठा आहे. जोरदार पाऊस न झाल्याने मराठवाड्यातील धरणांमध्ये अद्यापही पुरेसा पाणीसाठा नाही. जायकवाडी, पूर्णा येलदरी, पूर्णा सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न दुधना, सिना कोळेगाव या प्रकल्पांमध्ये अद्यापही उपयुक्त पाणीसाठा नाही. केवळ ऊर्ध्व पैनगंगामध्ये 34 टक्के पाणीसाठा असून विष्णुपुरी प्रकल्पात 51 टक्के पाणी साठा आहे.


बियाण्यांचा पुरवठा 93 %
राज्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र 134.69 लाख हेक्टर असून आजवर 73.8 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरीप हंगामासाठी 17.76 लाख क्विंटल म्हणजे मागणीच्या 93 टक्के बियाणे पुरवठा करण्यात आला आहे. खतांच्या बाबतीतही 88 टक्के पुरवठा करण्यात आल्याचा दावा मंत्रिमंडळाने केला आहे.


टँकर्सच्या संख्येत घट
एकंदर 2 हजार 209 गावे आणि 8 हजार 59 वाडयांना 2 हजार 897 टँकर्स पाणीपुरवठा करत आहेत. गेल्या वर्षी याच सुमारास 2 हजार 483 टँकर्स होते. सध्या राज्यातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा 5 जिल्ह्यांमध्ये मिळून जनावरांच्या 792 छावण्या आहेत. त्यात 4 लाख 77 हजार 283 मोठी आणि 68 हजार 700 लहान अशी 5 लाख 45 हजार 983 जनावरे आहेत.