मुंबई - दीड-दोन वर्षांच्या संघर्षानंतरही घरे वाचवण्यात यश येत नसल्याने अखेर ‘कॅम्पा कोला’च्या रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर सोमवारपासून सुरु होणा-या महापालिकेच्या कारवाईत कोणताही अडथळा न आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, आज सकाळपासून पालिकेच्या अधिका-यांनी कॅम्पाकोलातील सर्व 102 अनधिकृत फ्लॅटचे वीज, गॅस व पाणी कनेक्शन तोडून टाकले. याबाबत सांगितले जात आहे की, अतिरिक्त एफएसआयचा वापर बेघर होणार्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून मिळाले आहे. त्यामुळेच कॅम्पाकोलावासियांनी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
कॅम्पा कोलातील अनधिकृत मजल्यांविरोधात महापालिकेने कारवाईचे प्रयत्न सुरू मागील तीन-चार दिवसापासून केले होते.. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येणार होती. मात्र रहिवाशांनी घरे न सोडण्याची ताठर भूमिका घेतल्याने शुक्रवारपासून पालिका व रहिवाशांमध्ये संघर्षाची धार वाढत होती. अखेर यातून सर्वांचीच सुटका झाली आहे.
वाढीव एफएसआय मिळणार- मनसे आमदार बाळा नांदगावकर यांच्या मध्यस्थीनंतर रहिवाशांनी रविवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महापालिकेच्या कारवाईनंतर बेघर होणार्यांचे पुनर्वसन आणि नियमानुसार जो वाढीव एफएसआय इमारतीला मिळू शकेल, त्याचा वापर करून बेघर रहिवाशांच्या निवासाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती रहिवासी संघटनेतर्फे आशिष जालान व नांदगावकर यांनी दिली.
कायदा तोडणार नाही : मुख्यमंत्री- ‘कॅम्पा कोला इमारतीबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच कारवाई होत आहे. आपण याबाबत कायदा तोडून कोणतीही मदत करू शकत नाही,’ या भूमिकेचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रहिवाशांच्या शिष्टमंडळासमोर पुनरुच्चार केला. कॉँग्रेस- राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षासह विरोधकांनीही कॅम्पा कोला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार मागणी केली होती, विधिमंडळातही हा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र तेव्हापासून मुख्यमंत्री आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
आता चालणार हातोडा- दीड-दोन वर्षांच्या संघर्षांनतरही सरकार किंवा कायद्याच्या पातळीवर कुठेही घरे वाचवण्याबाबत आशादायी चित्र दिसत नसल्याने अखेर रहिवाशांचा विरोध मावळला. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने आजपासून कारवाई सुरु केली आहे. यात सर्वप्रथम अनधिकृत सदनिकांतील रहिवाशांचे पाणी, वीज आणि गॅस कनेक्शन तोडले गेले. तसेच उद्या (मंगळवार)पासून इमारत पाडण्याचे काम सुरू होऊ शकते.
छायाचित्र- वीज मीटरचे कनेक्शन तोडताना पालिकेचे कर्मचारी..