आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज वीज, पाणी तोडणार; मुख्यमंत्री भेटीनंतर कॅम्पा कोला रहिवाशांचा विरोध मावळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दीड-दोन वर्षांच्या संघर्षानंतरही घरे वाचवण्यात यश येत नसल्याने अखेर रविवारी ‘कॅम्पा कोला’च्या रहिवाशांनी भूमिका मवाळ केली. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी महापालिकेच्या कारवाईत कोणताही अडथळा न आणण्याचा निर्णय घेतला. मात्र, अतिरिक्त एफएसआयचा वापर बेघर होणार्‍या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे सोमवारी या इमारतीची वीज, पाणी व गॅस कनेक्शन तोडले जाणार आहे.

कॅम्पा कोलातील अनधिकृत मजल्यांविरोधात महापालिकेने कारवाईचे प्रयत्न सुरू केले आहेत. सर्वाेच्च न्यायालयानेही रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी मुदत दिली. मात्र, घरे न सोडण्याच्या भूमिकेवर रहिवासी ठाम होते. यातूनच शुक्रवारपासून पालिका व रहिवाशांमध्ये संघर्षाची धार वाढत होती.

वाढीव एफएसआय मिळणार
मनसे आमदार बाळा नांदगावकर यांच्या मध्यस्थीनंतर रहिवाशांनी रविवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महापालिकेच्या कारवाईनंतर बेघर होणार्‍यांचे पुनर्वसन आणि नियमानुसार जो वाढीव एफएसआय इमारतीला मिळू शकेल, त्याचा वापर करून बेघर रहिवाशांच्या निवासाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती रहिवासी संघटनेतर्फे आशिष जालान व नांदगावकर यांनी दिली.

कायदा तोडणार नाही : मुख्यमंत्री
‘कॅम्पा कोला इमारतीबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच कारवाई होत आहे. आपण याबाबत कायदा तोडून कोणतीही मदत करू शकत नाही,’ या भूमिकेचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रहिवाशांच्या शिष्टमंडळासमोर पुनरुच्चार केला. कॉँग्रेस- राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षासह विरोधकांनीही कॅम्पा कोला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार मागणी केली होती, विधिमंडळातही हा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र तेव्हापासून मुख्यमंत्री आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

आजपासून चालणार हातोडा
दीड-दोन वर्षांच्या संघर्षांनतरही सरकार किंवा कायद्याच्या पातळीवर कुठेही घरे वाचवण्याबाबत आशादायी चित्र दिसत नसल्याने अखेर रहिवाशांचा विरोध मावळला. त्यामुळे सोमवारी महापालिकेचे पथक कारवाई करणार आहे. सर्वप्रथम अनधिकृत सदनिकांतील रहिवाशांचे पाणी, वीज आणि गॅस कनेक्शन तोडले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांनी दिली. मंगळवारपासून इमारत पाडण्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

कॅम्पा कोलामधील सहा इमारतीतील 35 अनधिकृत मजल्यांवरील 96 फ्लॅट्स बेकायदा
कोर्टाच्या आदेशानंतरही कारवाईला विरोध करणार्‍या सोसायटीतील नागरिकांविरोधात गुन्हा
रविवारी पालिकेचे पथक व रहिवाशांमध्ये संघर्ष सुरू असताना एका महिलेस भोवळ आल्याने ती खाली कोसळली. या महिलेस तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.