आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटांचे पाच राज्यांत कॅन्सर उपचार केंद्र; उद्योगपती रतन टाटांनी दिली दिवाळी भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-टाटा आणि सामाजिक बांधिलकी हे एक समीकरण बनले आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतर उद्योग-व्यवसायांमधून मिळणारा पैसा हा मोठ्या प्रमाणावर समाजाला मदतीचा हात देण्यासाठी वापरायचे हे सूत्र टाटांनी आजही कायम ठेवले आहे. टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा हे या दृष्टीने उत्साहाने काम करत असून आता त्यांनी मुंबईतील टाटा कॅन्सर हाॅस्पिटलच्या धर्तीवर पाच राज्यांमध्ये कॅन्सर उपचार केंद्र सुरू करण्याचा  निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी १ हजार कोटी देऊन देशाला मोठी दिवाळी भेट दिली आहे.    
 
मुंबईतील परळच्या टाटा हाॅस्पिटलमध्ये या घडीला देशाच्या कानाकोपऱ्यातून कॅन्सर रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. यामुळे मुंबईवर खूप मोठा ताण पडत असून रुग्णांना उपचारासाठी खूप ताटकळावे लागत असल्याचे चित्र आहे. फक्त देशातीलच नव्हे तर शेजारच्या देशांमधील रुग्णही टाटामध्ये येत असतात. हे चित्र बदलण्यासाठी टाटा गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. यासाठी नवी मुंबई खारघर येथे अद्ययावत उपचार केंद्र उभारले आहे. मात्र गर्दी कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. अन्य राज्यांमध्येही उपचार केंद्रे उभारता येतील का, याची चाचपणी केली जात होती. आता त्याला यश आले असून केंद्र सरकारच्या साहाय्याने पाच राज्यांमध्ये उपचार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी टाटा फक्त १ हजार कोटी देऊन स्वस्थ बसणार नाहीत, तर उपचारासाठी लागणारी वैद्यकीय सेवा उभारून देण्यासाठी मदत करणार आहेत.    
 
केंद्र सरकारच्या मदतीने उभारण्यात येणाऱ्या कॅन्सर उपचार केंद्रांसाठी टाटा ग्रुपच्या कंपन्यांनी आपला सीएसआर फंड (कंपनी सामाजिक निधी) उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना रतन टाटा यांनी दिल्या आहेत. १ हजार कोटींमधून अंतर्गत पायाभूत सुविधा तसेच वैद्यकीय साधनसामग्री पाच केंद्रांना टाटांकडून देण्यात येईल. याचबरोबर पाचही राज्यांमधील डाॅक्टर तसेच पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना परळच्या टाटा हाॅस्पिटलकडून अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
 
परळच्या टाटावर मोठा ताण    
परळच्या टाटा हाॅस्पिटलमध्ये उपचारांसाठी कॅन्सर रुग्णांच्या कायम रांगा लागलेल्या दिसतात आणि यात वर्षाला मोठी भर पडत आहे. ७०० हाॅस्पिटलच्या या केंद्रात उपचारासाठी देशभरातून वर्षाला ६७ हजार नवीन रुग्ण येतात. याशिवाय वर्षभरात ४.५ लाख रुग्ण उपचारानंतरच्या तपासणीसाठीही येत असतात. तसेच आशिया,अाफ्रिका खंडातील देशांमधूनही रुग्ण येतात ते वेगळेच. विशेष म्हणजे एकूण रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण हे उत्तर प्रदेशमधून येतात, अशी माहिती समोर आली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...