आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदी घातलेल्या मॅगीची परदेशात निर्यातही नकोच : भारतीय अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरणाची कोर्टात याचिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशात बंदी घालण्यात आल्यानंतर बाजारातून परत मागवलेल्या मॅगीच्या निर्यातीस दिलेल्या परवानगीचा आदेश मागे घ्यावा, अशी विनंती भारतीय अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरणाने (एफएसएसएआय) मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे.
शिसेचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे भारतात मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर देशातील बाजारपेठेतून मॅगीचे संपूर्ण उत्पादन परत बोलावण्यात आले होते. परत बोलावलेला हा माल नष्ट करण्याऐवजी दुसऱ्या देशांमध्ये निर्यात करण्याची सवलत मुंबई उच्च न्यायालयाने नेस्ले कंपनीला दिली होती. मात्र, भारतीय अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरणाने बंदी घातलेल्या मालाच्या निर्यातीवर आक्षेप घेत निर्यात परवानगीचे आदेश परत घेण्याची विनंती केली आहे. याप्रकरणी न्या. व्ही. एम. कानडे आणि बी. पी. कोलाबावाला यांच्या पीठाने १७ जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. दरम्यान, न्यायालयाने नेस्ले कंपनीला निर्यात करण्यात आलेल्या मॅगी उत्पादनाबाबत शपथपत्र दाखल कररण्याचेही आदेश दिले आहेत.
एफएसएसआयचे मेहमूद प्राचा यांच्या मते, नेस्ले कंपनीकडून मॅगी निर्यात करण्याऐवजी नष्ट केली जात आहे. याचाच अर्थ ते खाण्यायोग्य नाही आणि निर्यातीसाठी कंपनीकडून नव्या मालाचे उत्पादन सुरू आहे. नव्या मालाच्या उत्पादनास न्यायालयाने परवानगी दिलेली नव्हती, असेही ते म्हणाले.
निकषाची पूर्तता करावी
अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी डॅरिअस खांबटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेस्लेला मॅगीचे उत्पादन आणि विक्री करायची असल्यास आधी त्यांनी भारतातील अन्न मानकांची व निकषांची पूर्तता करायला हवी.
"मॅगी इज सेफ'चा संदेश
बाजारातून मॅगीचे उत्पादन परत घेण्यासंदर्भात एफएसएसआयकडून नेस्ले कंपनीला अनेक ई-मेल पाठवण्यात आले. मात्र, कंपनीकडून त्यास कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. शिवाय, नेस्ले कंपनीच्या संकेतस्थळावर "मॅगी इज सेफ' असा संदेश देण्यात आला आहे, असेही प्राचा यांनी न्यायालयात सांगितले.