आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत शिक्षकांना चारित्र्य प्रमाणपत्रांची सक्ती; पडताळणीच्या बडग्यामुळे शिक्षक नाराज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील खासगी केंद्रीय शाळांनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून पोलिस पडताळणी तसेच चारित्र्य प्रतिज्ञापत्र सादर करावे, अशी सक्ती केली आहे. शिक्षणासारख्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात चारित्र्याची पडताळणी करण्यात येत असल्यामुळे शिक्षक वर्गात अस्वस्थता आहे. मात्र खासगी शाळांतील शिक्षक असंघटित असल्याने याबाबत विरोधाचा कोणताही पवित्रा ते घेऊ शकत नाहीत.  


राज्य सरकारने खासगी शाळांना शिक्षकांच्या पोलिस पडताळणीबाबत किंवा त्यांच्या चारित्र्य प्रतिज्ञापत्राबाबत कोणतेही आदेश दिलेले नाहीत. खासगी संस्थांच्या व्यवस्थापन समित्या तसा निर्णय घेत आहेत, अशी माहिती मुंबईचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली. तर मुंबईत केवळ केंद्रीय संस्थांबरोबर राज्य मंडळाच्या प्रतिष्ठित शाळांनीसुद्धा पोलिस पडताळणीची सक्ती केली आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केला.  अनुदानित शाळांमध्ये कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेताना त्याला चारित्र्याबाबतचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. त्यामध्ये गैर काहीही नाही, उलट खासगी शाळांना त्याची अंमलबजावणी करण्यास विलंब केला आहे, असा दावा मुंबई महापालिका शिक्षक सभेचे सरचिटणीस रमेश जोशी यांनी केला. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय शाळांना शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पोलिस पडताळणीबाबत नव्या सूचना आहेत, त्याची आम्ही अंमलबजावणी करत आहोत, अशी माहिती डॉन बॉस्को स्कूलच्या वतीने देण्यात आली.


सीबीएसईच्या सूचनेनुसार पडताळणी 

आमच्या शाळेत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्वीपासून पोलिस पडताळणी करण्यात येते. सीबीएसईने याबाबत नव्या सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार पडताळणीबरोबरच आता भारतीय दंड संहिता किंवा पोस्को या कायद्यांतर्गत आपल्यावर गुन्हे दाखल नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सर्व कर्मचाऱ्यांकडून घेत आहोत, अशी माहिती पोदार स्कूलने   दिली.

बातम्या आणखी आहेत...