मुंबई - शीतपेये, बाटलीबंद पाणी आणि दूध यासारख्या गोष्टी विकताना ब-याचदा दुकानदार ती थंड करण्याचे वेगळे पैसे आकारतात. मात्र अशा पद्धतीने कूलिंग चार्जच्या नावाखाली दुकानदाराला मूळ किमतीपेक्षा अधिकचे पैसे न देण्याचे आवाहन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केले आहे. शिवाय एमआरपीपेक्षा अधिकच्या पैशाची मागणी करणा-या दुकानदारांविरोधात तक्रार करण्यासाठी एक टोल फ्री नंबरही सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
कूलिंग चार्जेसच्या नावाखाली अधिकचे पैसे मागणा-या दुकानदारांवर कारवाई करण्याच्या सूचना वैधमापनशास्त्र अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. या यंत्रणेने आतापर्यंत राज्यभरात १७५ दुकानांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, रेशन दुकानांमधून सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असलेल्या काळाबाजार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींची दखल घेत आता खुद्द बापट पुढे सरसावले आहेत. मुंबईतील मुलुंड परिसरातल्या सहा दुकानांवर त्यांनी रविवारी अचानक धाडी टाकल्या. यापैकी दोन दुकानांच्या धान्याच्या साठ्यामध्ये तफावत आढळल्याने या दोन्ही दुकानांच्या मालकाविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत मुलुंड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बापट यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
इथे करा तक्रार
‘एमआरपी’पेक्षा जास्त पैसे घेणा-या दुकानदारांवर कारवाई करण्याच्या सूचना अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच अशा प्रकारांबाबत तक्रारींसाठी ०२२-२२८८६६६६ हा दूरध्वनी क्रमांक सुरू केला आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत अशा दुकानदारांच्या विरोधात ग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे. अशा तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन बापट यांनी ग्राहकांना केले आहे.