आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CBI Submit Gopinath Munde\'s Death Probe Report To Home Ministery

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूमागे कोणताही कट नाही, निवडणुकीच्या तोंडावर CBI चा निर्वाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- चार महिन्यापूर्वी दिल्लीत झालेल्या दिवगंत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती मृत्यूमागे कोणताही घातपात नसल्याचा निर्वाळा सीबीआयने दिला आहे. सीबीआयने केंद्रीय गृहमंत्रालयाला याबाबतचा अहवाल आज सादर केला. त्यात ही बाब पुढे आली आहे. दरम्यान, सोमवारी रात्री गडकरींवर हल्ला होण्यामागे मुंडेंच्या मृत्यूची चौकशीबाबत सरकार टाळाटाळ करीत असल्याने वंजारी समाजाच्या तरूणाने नैराश्यातून गडकरींवर बूट उगारल्याचे पोलिस तपासात पुढे आल्याने व विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला फटका बसू नये म्हणून भाजपनेच हा अहवाल तत्काळ पुढे आणण्याच्या जोरदार हालचाली केल्याचे कळते आहे.
गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील भाजपचे एक बडे नेते होते. लोकनेता अशी बिरूदावली मिळवलेल्या मुंडेंमागे राज्यातील मोठे जनमत होते. राज्यातील बहुजन समाज भाजपमागे जोडण्यात मुंडेंचे संपूर्ण योगदान होते. मात्र, या समाजातून मुंडेंच्या अपघाती मृत्यूबाबत शंका उपस्थित केली जात होती. भाजपमधील काही बहुजन नेत्यांनीही सीबीआयची मागणी लावून धरली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारसह राज्यातील सर्वच पक्षांनी मुंडेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याची मागणी मोदी सरकारकडे केली होती.
मोदी सरकारने जुलै महिन्यात मुंडेंच्या अपघाती मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी मान्य करीत सीबीआयला तसे आदेश दिले होते. आता तीन-चार महिन्यानंतर सीबीआयने मुंडेंच्या अपघाती मृत्यूचा अहवाल तयार करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या विभागाकडे सादर केला आहे. हा अहवाल अधिकृतरित्या जाहीर केला नसला तरी त्यातील निष्कर्ष बाहेर आला आहे. यात मुंडेंच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसल्याचा निर्वाळा सीबीआयने दिला आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना सोमवारी रात्री पुण्यातील कोथरूड भागात जो बूट मारण्याचा प्रयत्न झाला त्यामागे गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूचे कारण असल्याची चर्चा आता पुण्यात दबक्या आवाजात सुरु झाली आहे. ज्या माथेफिरू तरूणाने गडकरींवर बूट उगारला त्याचे नाव भारत कराड असून तो वंजारी समाजाचा व भाजपचाच कार्यकर्ता असल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी मात्र या माथेफिरूने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे सांगत याप्रकरणाला वेगळे वळण मिळू नये यासाठी आटोकाट प्रयत्न केला जात आहेत. मात्र या घटनेनंतर भाजपमध्ये याची धास्ती वाढली व लागलीच अहवाल सादर करण्याबाबत 'आदेश' दिल्याचे कळते.
मुंडेंच्या अपघात घातपात असल्याचा संशय- गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूमागे नक्कीच घातपात असावा असे बोलले जात होते. यामुळे मुंडे समर्थकांत व बहुजन समाजात मोठी नाराजी आहे. या नाराजीचा आता होऊ घातलेल्या विधानसभेत फटका बसेल अशी भाजपमधील नेत्यांनाच वाटत होते. त्याचीच दखल घेऊन भाजपकडून निवडणुकीच्या 8 दिवस अगोदर सीबीआयला अहवाल सादर करण्यास सांगितल्याचे कळते. हा अहवाल आज सादर करण्यामागे सोमवारी पुण्यात घडलेल्या घटनेचा संदर्भ आहे. गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत चार महिन्यापूर्वी अपघाती निधन झाल्यानंतर तो अपघात नसून घातपात असल्याचा शंका उपस्थित केली जात होती.
विरोधकांसह भाजपमधील अनेक नेत्यांनी मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर या चर्चेला आणखीच तोंड फुटले होते. गडकरी-मुंडे यांच्यातील राजकीय वितृष्टामुळे मुंडे समर्थकांत गडकरींबाबत रोष आहे. त्यामुळेच मुंडेंच्या अंत्यविधीला गडकरींना भाजपमधील काही मंडळींनी जाऊ दिले नव्हते. एवढेच नव्हे तर आता गडकरींना बीडमध्ये प्रचारालासुद्धा येऊ दिले नाही. मुंडेंचा अपघाती मृत्यू हा वंजारी समाजासाठी मोठा धक्का होता. तो धक्का सहन होत नसल्याने कालच्या तरूणाने गडकरींवर बूट उगारून निषेध व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. अखेर भाजपने यावर पडदा टाकत सीबीआयचा अहवाल पुढे आणला आहे.