डॉ.दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ज्या साक्षीदाराच्या जबाबाच्या अाधारे सीबीआयने तावडेंना अटक केली तो साक्षीदारच बोगस असून त्याच्यावर महालक्ष्मी देवस्थानातील भ्रष्टाचारासंदर्भात गंभीर आरोप असल्याचे सनातन संस्थेने म्हटले आहे. या साक्षीदाराला सीबीआयने पैसे देऊन खरेदी केल्याचे सांगत संस्थेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही सनातनने केला.
हिंदू जनजागृती समितीचा साधक असलेल्या वीरेंद्रसिंह तावडेच्या चौकशीतील धक्कादायक खुलाशानंतर अडचणीत आलेल्या सनातन संस्थेने आता सीबीआयच्या चौकशीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. हा सर्व सनातन संस्थेला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप शुक्रवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेत संस्थेच्या प्रवक्त्यांनी केला.
सीबीआयने कोल्हापूरच्या संजय साडविलकर या व्यक्तीला प्रमुख साक्षीदार म्हणून पुढे केले आहे. हा साक्षीदार चांदीचा व्यापारी असून त्याने कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या चांदीच्या रथकामात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सनातनच्या अभय वर्तक यांनी केला. तर हिंदू विधिज्ञ परिषदेचे अॅड. संजीव पुनाळेकर म्हणाले, या भ्रष्टाचाराचा सनातन संस्थेने पाठपुरावा केल्यानंतर आपण तुरुंगात जाऊ अशी भीती साडविलकरला वाटू लागल्यानेच त्याने संस्थेची बदनामी करण्यासाठी खोटे जबाब दिले आहेत. तसेच तावडेंच्या कोल्हापूरमधील वास्तव्यात असलेल्या ओळखीचा फायदा घेत साडविलकरने त्यांनाही गोवल्याचेही पुनाळेकर म्हणाले.
आशिषखेतान यांचा तपासात हस्तक्षेप :सीबीआयच्या तपासाबद्दल प्रश्न उपस्थित करताना सनातनचे प्रवक्ते वर्तक यांनी पूर्वाश्रमीचे पत्रकार आणि सध्या आम आदमी पार्टीचे सदस्य असलेल्या आशिष खेतान यांच्यावरही आरोप केले. सीबीआय आपल्या तपासाबद्दल पोलीसांनाही माहिती देत नसताना सीबीआयच्या प्रत्येक हालचालीची आणि तपासातील गोपनीय दस्तएेवजांची माहिती खेतान यांना अगोदरच कशी मिळते, असा सवालही त्यांनी केला. एका इंग्रजी नियतकालिकासाठी दाभोलकर हत्याप्रकरणाचा पाठपुरावा करत असताना खेतान यांनी पुण्याचे तत्कालीन पोलिस अायुक्त गुलाबराव पोळ यांच्या प्लँचेट प्रकरणाचे स्टींग केले होते. एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यामार्फत प्लँचेट करत पोळ यांनी दाभोलकर यांचा आत्म्याकडूनच माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
तावडेच्या कॉल डिटेल्सच्या आधारे सीबीआयने तपास केला असून दाभोलकर यांच्या हत्येच्या काही दिवस अगोदर एक पोलिस अधिकारीच तावडेंच्या संपर्कात असल्याचा तपास पथकाला संशय आहे. या अधिकाऱ्यानेच तावडेला दोन रिव्हॉल्व्हर्स पुरवली असावीत, असा सीबीआयच्या अधिकाऱ्यांना संशय असून त्या दिशेने तपास केला जात असल्याची माहिती सीबीआयमधील सूत्रांनी दिली.
मारेकऱ्यांना प्रकाशअण्णाने गोळ्या पुरवल्या?
कोल्हापूर- मूळचा आंध्र प्रदेशमधील असलेल्या जेपी उर्फ प्रकाश आण्णा या सनातनशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीने नरेंद्र दाभाेलकर यांची हत्या करण्यासाठी मारेकऱ्यांना गाेळा पुरवल्याचा संशय आहे. प्रकाशचे कोल्हापूर, गोवा आणि कर्नाटकात येणे जाणे असायचे अशीही माहिती पुढे आली आहे. वीरेंद्र तावडे याने कोल्हापुरातील साक्षीदार बनलेल्या व्यक्तीकडे बंदुकीच्या गोळ्यांची मागणी केली होती. मात्र या साक्षीदारांने गोळ्या देण्यासाठी असमर्थता दर्शवल्यानंतर मग प्रकाशआण्णाने तावडेला गोळ्या पुरवल्याचा संशय आहे. दरम्यान, पोलिस तावडे यांच्या संपर्कातील अनेकांशी चौकशी करत असून दुसरीकडे कोल्हापूर पोलिसांनी गुरूवारीच तावडेची चौकशी केली.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)