आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरातील आश्रमात सीसीटीव्ही बसवणार, सरकारने दिली उच्च न्यायालयात माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यभरातील बालसुधारगृह व महिला आश्रमात लवकरच सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात देण्यात आली. दरम्यान, गेल्या काही दिवसांत महिला आश्रमात मोठ्या प्रमाणात घडलेल्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि बी. पी. कुलाबवाला यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली.

माटुंगा येथील बालसुधारगृहात यापूर्वीच सीसीटीव्ही बसवण्यात आल्याची माहिती सरकारकडून न्यायालयात सुनावणीदरम्यान देण्यात आली. काही महिन्यांपूर्वी पारयस या स्वयंसेवी संस्थेने राज्यातील बालसुधारगृह आणि महिला आश्रमाला भेट दिली होती. संस्थेने आपल्या अहवालात आश्रमात सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याचे नमूद केले होते. त्यानुसार सरकारने सुरक्षेच्या उपाययोजना आखाव्यात, अशी सूचना न्यायालयाने सरकारला केली. माटुंगा येथील बालसुधारगृहात लैंगिक अत्याचार होतात. तसेच येथे ड्रग्जही सहज उपलब्ध होते, असे अलीकडेच निदर्शनास आले होते. २८ मे रोजी एका सतरा वर्षांच्या मुलाचा बालगृहात मृतदेह आढळला होता. दरम्यान, याप्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.