आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारांना काही क्षणात ओळखणार सीसीटीव्ही !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 26/11 च्या हल्ल्यानंतर मुंबईत सीसीटीव्ही बसवण्याची केलेली घोषणा पाच वर्षांनी प्रत्यक्षात येत आहे. हे कॅमेरे बसवल्यानंतर केवळ सुरक्षाच कडक होणार नसून गुन्हेगार ओळखण्याचे ‘कसब’ही या यंत्रणेत असणार आहे, अशी माहिती गृह विभागाचे सचिव विनीत अग्रवाल यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

2008 मध्ये घोषणा झाल्यानंतर मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागला. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह गृह विभागातील काही वरिष्ठ अधिकारी विदेशात जाऊन तेथील सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा यंत्रणेची माहितीही घेऊन आले. तरीही ही यंत्रणा मुंबईत बसवण्याच्या कामास पाच वर्षे वाट पाहावी लागली. आता या कामाने गती घेतली आहे. मुंबईत सहा हजार सीसीटीव्ही बसवण्यासाठी दोन-तीन आठवड्यांत निविदा काढण्यात येणार आहेत. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीची याबाबत बैठक नुकतीच झाली.

अग्रवाल म्हणाले की, लंडनमधील सीसीटीव्ही कॅमेरे गुन्हे रोखण्याचेही काम करतात. तेच काम मुंबईतील कॅमेरेही करतील अशी आमची योजना आहे. एखाद्या ठिकाणी एखादी व्यक्ती बराच काळ उभी असेल तर कंट्रोल रूममध्ये बसलेला कर्मचारी त्या व्यक्तीवर कॅमेरा झूम करून त्याचा फोटो काढेल. तो फोटो मुंबईतील पोलिसांनी तयार केलेल्या गुन्हेगारांच्या डाटाबेसबरोबर काही क्षणातच तपासला जाईल. जर ती व्यक्ती पोलिसांच्या गुन्हेगारांच्या यादीत असेल तर लगेचच पोलिसांना सूचना जाईल आणि त्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले जाईल. यामुळे ती व्यक्ती जर काही घातपात करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते रोखणे शक्य होणार आहे. यासाठी पोलिस सर्व गुन्हेगारांच्या माहितीचे संगणकीकरण करणार आहेत.

कंट्रोल रूममध्ये रेकॉर्डिंग नाही
मुंबईतील सीसीटीव्हीची योजना 650 कोटी रुपयांची आहे. यामध्ये सहा हजार कॅमेरे पाच टप्प्यांत संपूर्ण मुंबईत लावण्यात येणार आहेत. ज्या कंपनीला हे कंत्राट दिले जाईल ती कंपनीच यासाठी काही प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून देणार आहे, ते पोलिसांबरोबर काम करतील. कॅमेर्‍याच्या रेकॉर्डिंगचा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी कंट्रोल रूममध्ये रेकॉर्डिंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार नाही.

तंत्रज्ञान अपडेट करणे शक्य
दिवसेंदिवस नवनवे तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर अपडेट करता येतील अशाच प्रकारचे कॅमेरे बसवण्याची अट निविदाकार कंपनीवर घालण्यात येणार आहे. या कॅमेर्‍यांमध्ये ऑटोमॅटिक नंबर प्लेट रजिस्ट्रेशन (एएनपीआर) कॅमेर्‍यांचाही समावेश असणार आहे, ज्यामुळे गाड्यांच्या नंबरप्लेट रेकॉर्ड करून ठेवणे शक्य होईल. कॅमेरे लावल्यानंतर सुरक्षा कडक होणार असून गुन्हे कमी होतील अशी आशा अग्रवाल यांना आहे.