आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सीसीटीव्ही’ प्रणालीमध्ये विलंब नाही - आर. आर पाटील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी झालेल्या विलंबावरून गृहमंत्री आर. आर. पाटील चांगलेच अडचणीत आले असून याविषयी इतके दिवस गप्प असणार्‍या आबांनी मंगळवारी माध्यमांसमोर आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही बसवण्यासाठी विलंब झाला नसून निविदा प्रक्रियेत काही अडचणी असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. गेल्याच आठवड्यामध्ये केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्वत: सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी झालेल्या विलंबाबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. आपल्याच पक्ष प्रमुखाकडून पाटील यांना घरचा आहेर मिळाल्याने आता केवळ खुलासा करण्यापलीकडे त्यांच्याकडे काहीच पर्याय उरला नसल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यामुळे याबाबत मुख्य सचिवच सांगू शकतील, असे त्यांनी सुरुवातीला सांगितले. मात्र त्या समितीचा अहवाल उद्या आपल्याकडे आल्यावर याबाबत अधिक सांगता येईल, असे गृहमंत्री म्हणाले. सीसीटीव्ही बसवण्याच्या निविदा प्रक्रियेमध्ये काही कंपन्या ब्लॅकलिस्टेड होत्या. त्यांना जर परवानगी दिली असती तर या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते आणि पत्रकारांनीच त्याबद्दल बातम्या दिल्या असत्या, असा टोमणाही त्यांनी या वेळी मारला. तसेच लंडनमध्ये सीसीटीव्ही पाहण्यासाठी आपण स्वत:च्या खर्चाने गेलो होतो, जनतेच्या पैशाने नव्हे. माध्यमांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी पत्रकारांवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. पण मुळात शरद पवार यांनी मुंबईमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास झालेल्या विलंबाबाबत केलेल्या वक्तव्यावर मात्र गृहमंत्र्यांनी मौन बाळगले.
केवळ माध्यमेच नव्हे तर पवारांनी स्वत: सीसीटीव्ही अजून न बसवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती, असे विचारले असता गृहमंत्री काहीच बोलले नाहीत. मुंबईमध्ये 26/11 च्या हल्ल्याला चार वर्षे होऊनही अद्याप शहरात सीसीटीव्हीची निविदाही न काढल्याबद्दल पवार यांनी यावेळी गृहमंत्र्यांना फटकारले होते. सीसीटीव्हीच्या पाहणीसाठी केलेल्या लंडनवारीची आठवणही त्यांनी काढली.