मुंबई - जाहिरात करणा-या सेलिब्रिटीला त्या उत्पादनातील त्रुटींसाठी जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईचा बडगा कसा काय उगारला जाऊ शकतो, हेच मला कळत नाही. सेलिब्रिटी केमिस्ट नसतात. त्यामुळे त्यांना उत्पादनातील दोषाबाबतची माहिती असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे प्रख्यात जाहिरात गुरू पीयूष पांडे यांनी म्हटले.
"मॅगी'मध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट आणि शिसे यांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळल्यानंतर या उत्पादनाच्या सुरक्षेवरून वाद उद्भवला आहे. मॅगीची जाहिरात करणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित व प्रीती झिंटा यांच्यासह नेस्ले कंपनीच्या दोन अधिका-यांविरोधात गुन्हे दाखल झाले अाहेत. या पार्श्वभूमीवर पांडे म्हणाले की, कंपनी उत्पादनांसाठी जबाबदार असते. मात्र त्या उत्पादनातील बाबींची माहिती जाहिरात करणा-याला असणे शक्य नाही. प्रत्येक उत्पादनासाठी सरकारने मानक तयार करायला हवे. त्याचे कोणी उल्लंघन केल्यास नक्कीच कारवाई करायला हवी. गोरे बनण्यासाठी असलेल्या क्रीमपासून ते उंची वाढवण्याचा दावा करणा-या औषधांपर्यंत अनेक उत्पादने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. या प्रकारच्या उत्पादनांच्या दर्जाबाबतही साधकबाधक चर्चा व्हायला हवी.’