आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebrity Change Fashion Status In Election News In Divya Maratahi

निवडणुकीसाठी कलाकारांनी बदलले ‘फॅशन स्टेटस’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - निवडणुकीच्या मैदानात नशीब आजमावू पाहणार्‍या मराठी कलाकारांनी निवडणुकीसाठी आपला मेक-ओव्हर केला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत त्यांचा हा मेक-ओव्हर पुढार्‍याला वा राजकारण्याला शोभेलसा असला तरी त्यांची पडद्यावरील प्रतिमा त्यामुळे लोक विसरू शकतील का, याबद्दल शंकाच आहे. राखी सावंत, महेश मांजरेकर, दीपाली सय्यद या मराठी कलाकारांनी आपली ‘ड्रेसिंग स्टाइल’ बदलली आहे. दुसरीकडे श्रीदेवी, हेमामालिनी मात्र गॉगल, डिझायनर, पण बारीक काठाच्या साड्या नेसूनच प्रचार करीत आहेत.

पडद्यावर आणि पार्ट्यांमध्ये नट-नट्यांचे पोशाख हे अनेकदा चर्चेचे विषय असतात. विद्या बालनची साडी डिझाइन करणारी व्हिक्टोरिया बेकहॅम ही ऑस्ट्रेलियन फॅशन डिझायनर त्यामुळेच मध्यंतरी चर्चेत आली होती. मात्र हीच कलाकार मंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरली की त्यांचे पोशाख कमालीचे बदलून जातात. त्याचा प्रत्यय या निवडणुकीमुळे सामान्य जनतेला येत आहे. एरवी आयटम गर्लच्या रूपात दिसणारी झकपक आणि उत्तान कपडे घालणार्‍या राखी सावंतने निवडणुकीसाठी स्वत:चा पक्ष स्थापन केल्यावर मात्र नूरच पालटून टाकलाय. ‘हिरवी मिरची’ या आपल्या चिन्हाला शोभेलसा हिरवा कुर्ता, सलवार आणि हिरवा स्कार्फ अशा पोशाखात सध्या ती वावरते आहे. तिचा फॅशन डिझायनर कोण, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

महेश मांजरेकरही एरवी मिफ्टा वा इतर चित्रपटविषयक समारंभांमध्ये ज्या झकपक पोशाखात दिसतो त्याच्या अगदी उलट आता पुढार्‍याच्या वेशात दिसतो आहे. त्याची पत्नी मेधा मांजरेकरच त्याच्या पोशाखाची काळजी घेत आहे. अभिनेत्री दीपाली सय्यददेखील ‘घुंगराच्या नादात’ चित्रपटातील मेकअप व वजनदार डिझायनर साडी वा फॅशनेबल ट्राउझर व टॉप न घालता साध्या पोशाखात वावरते आहे. चित्रपटाच्या बाहेर वास्तव आयुष्यातही या कलाकारांचे फॅशन स्टेटस गरजेनुसार बदलत जाते याचीच प्रचिती सध्या जनता घेत आहे.

बॉलीवूडच्या कलाकारांनी मात्र आपले फॅशन स्टेटस फारसे बदललेले दिसत नाही. श्रीदेवीने अमरसिंह यांच्या प्रचारात आकर्षक अशी गुलाबी साडी, गॉगल घातला होता, तर हेमामालिनी यांनी आकाशी रंगाची साडी आपल्या प्रचारासाठी नेसली होती. गुल पनाग, किरण खेर यांनीदेखील साध्या पण स्टायलिश पोशाखातच प्रचार केलेला दिसून आला.

नंदू ‘आम आदमी’
या सगळ्या कलाकारांच्या उलट नंदू माधव यांचे उदाहरण आहे. एरवीही अत्यंत साधे राहणारे नंदू माधव यांना आपले फॅशन स्टेट्स त्यामुळे बदलण्याची गरजच पडली नाही. ‘आप’कडून निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्यात असलेला ‘आम’पणा त्यांना कामी येतो आहे. त्यामुळे नंदू माधव यांना सध्या तरी फॅशन डिझायनरचा सल्ला घेण्याची आवश्यकता पडलेली नाही.