आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रिटींचा इको-फ्रेंडली बाप्पा, नाना पाटेकरच्या घरी फुलांची वैविध्यपूर्ण सजावट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शुक्रवारी घराघरांत गणरायाची स्थापना करण्याची लगबग असताना मराठी सेलिब्रिटीदेखील आपापल्या घरातील गणरायाच्या स्थापनेत मग्न आहेत. यासाठी काही
कलाकारांनी तर स्वत: गणपती तयार करणेदेखील उत्साहाने शिकून घेतले आहे, तर काहींनी घरच्या घरी सजावट करण्याचीही परंपरा कायम राखली आहे. त्यामुळे मंगल क्षणांना घेऊन येणारा गणपती आपल्या हातांनी घडवण्यापासून सजावट करण्यापर्यंत हे कलाकार हमखास वेळ काढून गणेशोत्सवाचा उत्साहात प्रारंभ करण्यात सध्या रमले आहेत.

दिग्दर्शक रवी जाधव वेळ काढत गेल्या काही वर्षांपासून पत्नीबरोबर शाडू मातीचा गणपती बनवतात. तसेच त्याचे घरच्या घरी मंगल कलशामध्ये विसर्जनही करतात. नाना
पाटेकरदेखील घरच्या घरी फुलांची वैविध्यपूर्ण सजावट करून गणेशोत्सव साजरा करतात. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिनेदेखील नुकताच एका तरुणीकडून गणपती बनवायचे प्रशिक्षण घेतले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीने निसर्गाला हानी पोहोचवायची? यामुळे कलाकारांनी घरच्या घरीच गणपती तयार करून विसर्जित करण्याची प्रथा सुरू केली आहे.
रवी जाधव यांनी यंदा शेंदरी रंगाचा गणपती तर त्यांच्या पत्नीनेदेखील कुंकवाच्या रंगाचा गणपती रंगवून गणरायाचे घरात स्वागत केले आहे. मृणाल कुलकर्णीने स्वत:च्या हाताने गणपती बनवण्याचा आनंद फेसबुकवर व्यक्त केला आहे.

मराठी कलाकारांचा उत्सव
अभिनेता स्वप्निल जोशी, शशांक केतकर, सौरभ गोखले, चिन्मय उदगीरकर, मानसी नाईक आदी कलाकारही गेल्या काही वर्षांपासून आपल्या घरी इको-फ्रेंडली गणपतीचीच स्थापना करत अाहेत. यंदादेखील या कलाकारांचा निसर्गाचे संवर्धन करणाऱ्यावर भर आहे. हे सगळेच कलाकार स्वत: मूर्ती बनवत नसले तरी शाडू मातीचीच मूर्ती विकत आणण्याबाबत हे कलाकार कायम आग्रही आहेत. त्यामुळे या कलाकारांचा यंदाचाही गणेशोत्सव निसर्गपूरकच असणार आहे.