आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: शेतकरी आत्महत्या रोखण्यास अक्षय, प्रियांका, कॅटरिना सरसावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारसह अनेक सामाजिक संस्था प्रयत्न करत आहेत. मात्र, या प्रयत्नांना आणखी बळकटी मिळावी, यासाठी सरकारच्या वतीने सिने कलावंतांना साद घालण्यात आली आहे. राज्याचे पशु व दुग्ध संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केलेल्या अावाहनाला प्रतिसाद देत अक्षयकुमार, प्रियंका तसेच कॅटरिनाने शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेतला आहे.    

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी अक्षय कुमारने मोबाइल अॅप तयार केले आहे, तर प्रियंका अाणि कॅटरिना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतातील गोठ्यात जाऊन गाई तसेच म्हशीच्या दुधाचे महत्त्व पटवून देणार आहेत. या दोघी शेतकऱ्यांना अार्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे आवाहन करतील तसेच जनतेलाही आरोग्यासाठी दूध महत्त्वाचे असल्याचे पटवून देतील, अशी माहिती जानकर यांनी दिली.   

जानकर यांनी कलावंतांना पत्र पाठवून मदतीचे अावाहन केले हाेते. यात आर्थिक मदतीबराेबरच शेतमाल विकण्यासाठी मदत, दुधाच्या प्रचार- प्रसाराविषयी मदतीचे अावाहन अाहे. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त भागातील गाई- म्हशींसाठी वैरण विकास कार्यक्रम राबवणे, कोंबडीपालन, पशु दवाखाने उभारण्यासाठी आर्थिक मदत देण्यास सांगितले आहे. सोबत रस्त्यावरील कुत्रे आणि मांजरांसाठी लसीकरण कार्यक्रम राबवणे, प्राणी मोबाइल व्हॅनसाठी अर्थसाह्य असाही उल्लेख आहे.      

अक्षय कुमारने सैनिकांसाठी नुकतेच जय जवान हे अॅप तयार केले होते. आता आपण जय किसान हे शेतकऱ्यांसाठी अॅप सुरू केले असून यामधून निधी संकलनापासून ते इतर मदतीसाठी आवश्यक ती माहिती पुरवली जाईल, असे अक्षयने राज्य सरकारला कळवले आहे. सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असणाऱ्या उद्याेगपती रतन टाटा यांनीही शेतकऱ्यांसाठी मदतीचे अावाहन केले असल्याचे जानकर म्हणाले.   

जानकर अंड्यांचे सदिच्छादूत    
मंत्री महादेव जानकर हे स्वत: अंड्यांचे सदिच्छादूत होणार आहेत. ‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’, असे म्हणत रोज दोन अंडी खाण्याचे ते आवाहन करतील. महाराष्ट्रात रोज तीन कोटी अंडी लागतात अाणि यापैकी फक्त ७५ हजार अंड्यांचे उत्पादन राज्यात होते. उरलेली अंडी आंध्र आणि तामिळनाडूतून आयात हाेतात. यापुढे राज्याची गरज आपल्या भागातूनच पूर्ण झाली पाहिजे, यासाठी ते पुढाकार घेतील. तसेच मत्स्यबीज पश्चिम बंगालऐवजी आपल्या राज्यात तयार झाले पाहिजे, यासाठी विशेष प्रकल्प उभारले जात असल्याची माहितीही जानकरांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...