आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Censor Board News In Marathi, CEO Rakesh Kumar, Divya Marathi

सेन्सॉर बोर्डाचा लाचखोर सीईओ 3 दिवस कोठडीत, सीईओ आयटम डान्ससाठी घ्‍यायचा लाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रमाणपत्राच्या बदल्यात 70 हजार रुपयांची लाच मागणारा सेन्सॉर बोर्डाचा सीईओ राकेश कुमार याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. चित्रपटातील आयटम डान्सला परवानगी देण्यासाठीसुद्धा तो निर्मात्यांकडून लाच घ्यायचा, असा दावा सीबीआयने न्यायालयात केला आहे.

सीबीआयने मंगळवारी विशेष न्यायाधीश ए.डी.करंजकर यांच्यापुढे त्याला सुनावणीस हजर केले होते. राकेश कुमार हा जानेवारी महिन्यात सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष बनला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्याने कोणकोणत्या चित्रपटांना लाच घेऊन प्रमाणपत्र दिले होते याच्या चौकशीची गरज आहे. सीबीआय त्यांचीही चौकशी करणार आहे. छत्तीसगडमधील ‘मोर डऊकी के बिहाव’ या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेतल्याचा राकेश कुमारवर आरोप आहे. एका एजंटच्या माध्यमातून त्याने ही लाच स्वीकारली होती. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कुमारला निलंबित केले आहे.

आतापर्यंत तिघांना अटक
सीबीआयने या प्रकरणात कुमारसह तिघांना अटक केली आहे. अटकेतील एजंट श्रीपती मिश्राने कुमारला 5 ते 6 लाख रुपये दिले होते. तर सेन्सॉर बोर्डाचा सल्लागार सदस्य सर्वेश जयस्वालने त्याला साडेतीन लाख रुपये आणून दिले होेते. सीबीआयने जयस्वाललाही अटक केली आहे.

घरात सापडल्या अनेक महागड्या वस्तू
सीबीआयने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, राकेश कुमारच्या घरातून रोलेक्स, राडो इत्यादी ब्रँड्सच्या 33 महागड्या घड्याळी तसेच अन्य काही महागड्या वस्तूही सापडल्या आहेत. या वस्तू त्याच्याकडे कशा आल्या, याचे उत्तर राकेश कुमारने आतापर्यंत दिलेले नाही.

दिवसांनुसार ठरायची लाचेची रक्कम
राकेश कुमार हा एखाद्या चित्रपटाला फक्त 3 ते 4 दिवसांत प्रमाणपत्र देण्यासाठी दीड लाखांची, 7 ते 8 दिवसांत प्रमाणपत्र देण्यासाठी 25 हजार आणि लघुपटांसाठी 15 हजार रुपये घ्यायचा. अशा वरकमाईतून त्याने कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचा संशय आहे.