आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Cabinet In Maharashtra Latest News In Marathi

महाराष्ट्राला फारसे ‘अच्छे दिन’ नाहीच! यूपीएपेक्षा कमी मंत्री, महत्त्वाची खातीही दुरापास्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘अच्छे दिन आने वाले है’ असा आशावाद जागवणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीममध्ये पहिल्या टप्प्यात तरी महाराष्ट्राल फारसे ‘अच्छे दिन’ दिसत नाहीत. मावळत्या यूपीए सरकारच्या काळात 9 मंत्रिपदे पदरी असलेल्या महाराष्ट्राला सहाच मंत्रिपदे मिळाली आहेत. शिवाय गेली अनेक वर्षे राज्याकडे असलेली गृह व पेट्रोलियमसारखी महत्त्वाची खाती इतर राज्याकडे जाण्याचेही संकेत आहेत.
येत्या आॅक्टोबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक आहे. 2004 व 2009मध्ये केंद्रात काँग्रेस नेतृत्वात सरकार आले तेव्हाही चार-पाच महिन्यांवरच विधानसभा निवडणूक होती. त्यामुळे जातीय, प्रादेशिक संतुलन राखण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला होता.
परिणामी शिवराज पाटील व नंतर सुशीलकुमार शिंदेंच्या रूपाने गेली 10 वर्षे गृह खाते राज्याकडे होते. पंतप्रधानांनंतर हे दुसर्‍या-तिसर्‍या क्रमांकाचे मानाचे पद मानले जाते. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्यावर शिंदे यांच्याकडे लोकसभेतील गटनेतेपदही आले होते.
यूपीए 1 मध्ये शरद पवार (कृषी), सुशीलकुमार शिंदे ( ऊर्जा), शिवराज पाटील (गृह), ए.आर. अंतुले ( अल्पसंख्यक), मुरली देवरा (पेट्रोलियम), विलास मुत्तेमवार (अपारंपारिक ऊर्जा), प्रफुल्ल पटेल ( नागरी हवाई वाहतूक), पृथ्वीराज चव्हाण (पीएमओ राज्यमंत्री), सूर्यकांता पाटील ( ग्रामविकास राज्यमंत्री) अशी खाती राज्याकडे होती. त्या तुलनेत आता गडकरी, मुंडेंचा अपवाद वगळता इतरांकडे फारशी महत्त्वाची खाती येण्याची शक्यता कमीच आहे.
गडकरींपेक्षा मुंडेंना कनिष्ठ स्थान
मोदी मंत्रिमंडळात नितीन गडकरी यांना राज्यातून प्रथम क्रमांकाचे स्थान देण्यात आले. मागील लोकसभेत पक्षाचे उपनेते असलेल्या मुंडे यांना पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आलेल्या गडकरींपेक्षा कनिष्ठ स्थान देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे, मुंडेंचे समर्थक रावसाहेब दानवे यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे.
सोमय्यांना डावलले
काँग्रेस सरकारचे घोटाळे सातत्याने उघडकीस आणणारे आणि त्यासाठी न्यायालयीन लढाई लढणारे किरीट सोमय्या यांचा समावेश केंद्रिय मंत्रीमंडळात होईल, असा अ्ंदाज होता. मात्र त्यांना डावलून भाजपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष पियूष गोयल यांना संधी देण्यात आली. पक्षासाठी निधी उभारण्यात गोयल यांची भूमिका महत्वाची राहणार असल्याने बहुधा हा मान त्यांना देण्यात आला असावा. तसेच कोळसा घोटाळा उघडकीस आणणारे चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर, अमरावतीचे शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या समावेशाची अपेक्षाही व्यर्थ ठरली.
जातीय, प्रादेशिक संतुलन
गडकरींच्या रूपाने विदर्भाला स्थान मिळाले. जावडेकरांच्या रूपाने प. महाराष्ट्र व ब्राह्मण समाजाला संधी मिळाली. मुंडे, दानवेंमुळे (बहुजन- मराठा) मराठवाड्याला दोन मंत्रिपदे, तर अनंत गीते (कुणबी) व गोयल (वैश्य) यांच्यामुळे कोकण- मुंबईला प्रतिनिधित्व आहे.