मुंबई - मोदी सरकार 10 जूनपासून आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना Z-plus सुरक्षा प्रदान करणार आहे. भागवत यांना ज्या प्रकारची सुरक्षा मिळणार आहे, तशाच प्रकारची सुरक्षा सध्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना दिली जाते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भागवत हे काही दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर आहेत. त्यामुळेच त्यांना ही सुरक्षा प्रदान करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भागवत यांच्यासाठी एक बुलेटप्रूफ बीएमडबल्यू कार असेल. तसेच त्यांच्या ताफ्यात चार इतर एसयूव्हीचाही समावेश असेल. भागवत ज्या ठिकाणी जातील त्याठिकाणी दोन दिवसांपूर्वीच एक पथक पाहणी करून सुरक्षेची खबरदारी घेइल. भागवत यांना सीआयएसएफचे 190 कमांडो सुरक्षा पुरवतील.
190 जणांचे पथक
अशा प्रकारची सुरक्षा दिली जाणारे भागवत हे देशातील पहिलेच बिगरराजकीय व्यक्ती आहेत. त्यात भागवत कोणत्याही संविधानात्मक पदावर नसल्याने ही बाब आणखीच खास ठरते. गृह मंत्रालयाने Z-plus सेक्युरिटीसाठी सीआयएसएफला आदेश दिले आहेत. ते 10 जूनपासून जबाबदारी सांभाळणार आहेत.
काही वर्षांपूर्वी झाला होता संघ मुख्यालयावर हल्ला
2006 मध्ये लश्कर-ए-तोयबाने आरएसएसच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. भागवत यांच्या सुरक्षेचा आढावा घेताना ते दहशतवाद्यांच्या हिटलीस्टवर असल्याचे लक्षात घेतले असल्याचे सुत्रांनी सांगितले. सध्या महाराष्ट्र पोलीस आणि राज्य राखीव पोलिस दल संघ मुख्यालय आणि भागवत यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळून होते. 190 कमांडोची टीम ही जबाबदारी सांभाळणार आहे. या कमांडोंनाही एनएसजी कमांडोप्रमाणे प्रशिक्षण दिले गेले आहे. आधुनिक शस्त्रांसह ते मार्शल आर्टस् मध्येही पारंगत असतात.