आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टक्केवारीमुळेच मुंबईचा घात झाला, नितीन गडकरी यांची शिवसेनेवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘शिवसेनेला व्हिजनशी देणं-घेणं नाही, त्यांना टक्केवारी हवी आहे. या टक्केवारीनेच मुंबईचा घात केला आहे,’ अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली आहे. ‘मी साडेपाच लाख कोटींच्या कामाचे टेंडर काढले, पण कोणत्याही कंत्राटदाराने सांगावे की मला कंत्राट घेण्यासाठी पाच पैसे द्यावे लागले. तसे झाले तर मी राजकारण सोडून देईन,’ असे अाव्हानही गडकरींनी दिले.  

मुंबई महापालिकेतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पार्ले येथील सभेत गडकरींनी शिवसेनेला चांगलेच सुनावले. ‘प्लॅनरला ५० वर्षे पुढचा विचार करावा लागतो. मुंबईच्या  विकासात मात्र व्हिजनच नाही. १९९६ मध्ये मुंबईतील ५५ उड्डाणपुलांसाठी १८०० कोटींचा खर्च हाेता. ही इस्टिमेटेड काॅस्ट होती. मात्र, आम्ही १००० कोटींत ते पूर्ण करत ८०० कोटी वाचवले. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेला अंबानींकडून ३६०० कोटींचे टेंडर आले होते अाणि ते सगळ्यात कमी हाेते; पण आम्ही हे काम १६०० कोटींमध्ये पूर्ण केले. मुंबईवर गेली २० वर्षे शिवसेनेचे राज्य आहे. मात्र, नवे काय झाले? माॅरिशसच्या  समुद्रात वाकून बघितले तर चेहरा दिसतो, पण मुंबईतील समुद्र पाहिला तर घाण दिसते,’ असा टाेलाही गडकरींनी लगावला.  

नागपुरात आम्ही विकासाचा अजेंडा राबवला. मुंबईत मात्र सत्तेत असूनही भाजपच्या हातात काहीच नव्हतं. अामच्या उपमहापौराला अधिकार काहीच नव्हते. महापौर, स्थायी समिती शिवसेनेकडे. सर्व अधिकार असूनही त्यांनी दोन दशकांत काहीच केले नाही. 

घनकचऱ्याबाबत मी उद्धव ठाकरे यांच्याशी  बोललो होतो; पण काही झाले नाही. आम्ही नागपूरमध्ये कचऱ्यामधूनही पैसे मिळवले. मला वेगवेगळ्या राज्यांमधील  मंत्री, नेते भेटतात. विकासकामांसाठी पैसे मागतात. दिल्लीचे मुख्यमंत्री  केजरीवालही भेटले. पण गेल्या अडीच वर्षांत मुंबईच्या  महापौरांनी कधीच निधीची कधी मागणी केली नाही. याचा अर्थ शिवसेनेला विकास नको आहे. केवळ भावनेच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकायच्या आहेत,’ असे गडकरी म्हणाले. 
 
युती ही तर दोन्ही पक्षांची मजबुरी   
‘युती दोन्ही पक्षांची मजबुरी असते. दोघांनाही एकमेकांची गरज असल्यानेच समविचारी पक्ष एकत्र येतात. भाजपने युती केली नसती तर १९९५ मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता का? प्रादेशिक पक्षांबरोबर युती करू, असे शिवसेना म्हणते. पण मायावती, मुलायम, ममता यांच्याबरोबर  ते जाणार का? अाणि जाणार जरी असतील तर ते यांना घेतील का,’ असा चिमटाही गडकरींनी काढला. 
 
बातम्या आणखी आहेत...