आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Railway Local Service Stop Due To Technical Error

मुंबईत \'मरे\'ची सेवा ठप्प झाल्यानंतर संतप्त प्रवाशांची जाळपोळ, बघा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
मुंबई- ठाकुर्ली स्थानकावर पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची सेवा सकाळी 7 वाजल्यापासून ठप्प झालेली दुपारी 1 वाजता सुरू झाली. मध्य रेल्वे मार्गावरून सीएसटीकडे जाणा-या चारही मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या सहा तासांपेक्षा जास्त वेळ बंद होत्या. दरम्यान, ऐन सकाळी व कामाच्या वेळेत रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांनी दिवा येथे हिंसक रेल रोको आंदोलन सुरु केले होते.
कळवा, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, दिवा येथील स्टेशन्सवर लाखो प्रवाशी रेल्वे सेवा ठप्प झाल्याने अडकले होते. अनेक गाड्या रेल्वे ट्रॅकवर मध्येच थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरून चालत जाणे पसंत केले. महिलांचे अतोनात हाल झाले. प्रवाशांना आपापल्या कार्यालयात पोहचविण्यासाठी बेस्टने या मार्गावरून अतिरिक्त बस सोडल्या होत्या.
संतप्त प्रवाशांनी कामाच्या ठिकाणी पोहचता येत नसल्याने व रेल्वेच्या रोजच्या कोणत्या कोणत्या कारणाने सेवा ठप्प होत असल्याने हिंसक आंदोलन सुरु केले. प्रवाशांनी रेल्वे गाड्यांवर दगडफेक केली. यात काही मोटरमन जखमी झाले. तसेच पोलिसांनी प्रवाशांना रोखण्याचा प्रयत्न केला असता प्रवाशांनी पोलिसांच्या व्हॅनसह 4 गाड्या जाळून टाकल्या आहेत. प्रवाशांनी रेल्वे कार्यालयाची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. मात्र, प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर थांबून आंदोलन सुुरूच ठेवले होते.
कामावर जाता येत नसल्याने राग अनावर झाल्याने संतप्त होत प्रवाशांची रेल्वे प्रशासन व पोलिसांसोबत चांगलीच चकमक उडाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पेंटाग्राफ जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रवाशांनी आंदोलन थांबवावे व थांबलेल्या रेल्वे गाड्या सुरळित चालू द्यावात असे आवाहन मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी केले आहे.
गृहराज्यमंत्र्यांनी केले लाठीमाराचे समर्थन- दरम्यान, संतप्त प्रवाशांवर केलेल्या लाठीमाराचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी समर्थन केले आहे. प्रवाशांना मारहाण करण्याचा व त्यांना त्रास देण्याचा पोलिसांचा हेतू नव्हता. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करीत असल्याने पोलिसांनी त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवाशी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अशावेळी पोलिसांनी त्यांना केवळ पांगविण्यासाठी लाठीमार केल्याचे रणजित पाटील यांनी सांगितले. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असताना सरकार बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही असेही पाटील यांनी सांगितले.
मारहाण होताच मोटरमन यांचे काम बंद आंदोलन- दरम्यान, संतप्त प्रवाशांचा प्रसाद काही मोटरमन यांना मिळाल्याने सर्व मोटरमननी आहे त्या स्थितीत गाड्या सोडून गाडी बंद आंदोलन केले. त्यामुळे हॉर्बर लाईनची सेवा विस्कळित झाली. मात्र, तासाभराच्या आतच वरिष्ठ रेल्वे अधिका-यांनी मोटर मन यांच्याशी सुरक्षेची काळजी घेण्याची हमी देत कामबंद आंदोलन मागे घेण्यास सांगितले. हजारो प्रवाशी अडकल्याने व रेल्वे प्रशासन आपल्या पाठीशी असल्याने मोटरमन यांनी कामबंद आंदोलन मागे घेत कामावर हजर झाले आहेत.
पुढे पाहा, रेल्वे रोको आंदोलनाचे फोटो...