आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळ धावपटूएवढे फिट, लवकरात लवकर तुरुंगात पाठवा, अंजली दमानिया यांची न्यायालयाकडे मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणातील आरोपी व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर वैद्यकीय उपचार करणाऱ्या डाॅक्टर्सच्या पॅनलमधून डॉ. तात्याराव लहाने यांना बाहेर काढावे तसेच भुजबळ यांना तुरुंगाबाहेर काढून रुग्णालयातील वास्तव्यासाठी मदत करणाऱ्या तुरुंग प्रशासनातील अधिकाऱ्यांवरही न्यायालयाने अंकुश ठेवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात शुक्रवारी केली. दरम्यान,
भुजबळांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. ते धावपटूएवढे फिट असून लवकरात लवकर त्यांची रवानगी पुन्हा तुरुंगात करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या छगन भुजबळांच्या वारंवार होणाऱ्या रुग्णालय वास्तव्यावर हरकत घेणारा अर्ज दमानिया यांनी विशेष न्यायालयात दाखल केला आहे.
भुजबळांचे वैद्यकीय तपासणी अहवाल अतिशय चांगले असून एखाद्या धावपटूइतके ते फिट असल्याचा युक्तिवाद दमानिया यांनी केला. त्यावर भुजबळांची तब्येत ठीक नसल्याने केवळ उपचार घेण्यासाठी ते आर्थर रोड तुरुंगाबाहेर राहिले असून अजूनही त्यांची अँजिओग्राफी करायची आहे, असा युक्तिवाद भुजबळ यांच्या वकिलांनी केला.
तसेच अँजिओग्राफीसाठी भुजबळांची लेखी परवानगी गरजेची आहे. पण गेला महिनाभर भुजबळ हे या चाचणीसाठी लेखी परवानगी देत नाही ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास अाणून देत त्याबाबतचे एक पत्र आर्थर रोड जेलच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केले. त्यावर जर भुजबळांना अँजिओग्राफी करायची नसेल तर त्यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड कारागृहात करावी, अशी मागणी दमानिया आणि ईडीच्या वकिलांनी केली.

शुक्रवारी सुनावणीला सुरुवात होताच भुजबळांच्या वतीने तीन वकिलांनी आपल्याला युक्तिवाद करायचा आहे, असे न्यायालयाला सांगितले. त्यावर या वकिलांकडे भुजबळांचा वकालतनामा आहे का, असा प्रश्न अंजली दमानिया यांनी विचारला. त्यावर या वकिलांकडे भुजबळांचा वकालतनामा नसल्याचे स्पष्ट झाले. त्यावर वकालतनामा घेऊन या आणि युक्तिवाद करा, असे सांगत न्यायालयाने सुनावणी काही काळ तहकूब केली होती.

सीसीटीव्ही फुटेज मागवावे
दोन दिवस दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ही सुनावणी संपल्याचे न्यायालयाने जाहीर केले. १५ डिसेंबरपर्यंत छगन भुजबळांना जेजे रुग्णालयातील डॉक्टर्सना फक्त भेटता येईल, असे निर्देश कोर्टाने द्यावेत. तसेच दररोज भुजबळ यांना कोण भेटायला येतात त्याचे सीसीटीव्ही फुटेज कोर्टाने दररोज ईडीकडून मागवून घ्यावेत, अशी विनंतीही अंजली दमानिया यांनी न्यायालयाकडे केली.
बातम्या आणखी आहेत...