आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळ यांचीही लवकरच होणार चौकशी, ‘एसीबी’ बजावणार समन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भुजबळ कुटुंबीयांच्या खुल्या चौकशीदरम्यान राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष तपास पथकाला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने शनिवारी उच्च न्यायालयात अंतरिम अहवालच सादर केला जाणार आहे. या अहवालानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तपासाची पुढील दिशा स्पष्ट केली जाईल. दरम्यान, चौकशीच्या पुढच्या टप्प्यात थेट छगन भुजबळांनाच समन्स बजावण्याची तयारी एसीबीने केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळाप्रकरणी एसीबीमार्फत सध्या सुरू असलेल्या खुल्या चौकशीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र भुजबळ कुटंुबीयांकडून या चौकशीदरम्यान अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने एसीबीला उच्च न्यायालयासमोर अंतरिम अहवालच सादर करावा लागणार आहे.
गुरुवारी भुजबळांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ आणि पुतणे समीर या दोघांनाही एकत्रित चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र दोघांनीही तपास पथकासमोर गैरहजर राहणे पसंत केले. आता शुक्रवारचा अवघा एक दिवस चौकशीसाठी शिल्लक असून त्या दिवशी तरी दोघे एकत्रितपणे हजर राहतात की नाही, याबद्दल एसीबीचे अधिकारी साशंक आहेत.

तपासात असहकार्य : दीक्षित

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार भुजबळ कुटुंबीयांकडून चौकशीला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याची बाब आम्ही अगोदरच न्यायालयाच्या कानावर घातली आहे. त्यामुळे येत्या २८ तारखेला आम्ही चौकशीचा अंतरिम अहवालच उच्च न्यायालयासमोर सादर करणार आहोत.

चौकशीचे दोन टप्पे

चौकशीच्या पहिल्या टप्प्यात फक्त भुजबळ कुटुंबीयांचीच चौकशी करण्यात येत आहे. मात्र अंतरिम अहवाल सादर केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात छगन भुजबळ यांचीही चौकशी केली जाणार आहे. लवकरच छगन भुजबळ यांनाही समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती तपास पथकातील एका अधिकाऱ्याने दिली.