आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chaggan Bhujbal Meets Ncp Cheif Sharad Pawar Of His Silver Oak Residence

जेलमध्ये कधी टाकतात याची वाट बघतोय- भुजबळ प्रकरणावर पवारांची प्रतिक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) धाडसत्राने अडचणीत आलेले माजी मंत्री छगन भुजबळांच्या अडचणी वाढण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत त्यांचे बिघडलेले संबंध कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. दोघांमध्ये मानसिक दुरावा वाढल्याने तेलगी प्रकरणाच्या वेळेस भुजबळांना वाचविणाऱ्या पवारांनी या वेळेस मात्र त्यांच्या अडचणी वाढविण्यास हातभार लावल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच आज सकाळी भुजबळ यांनी पवारांची भेट घेतली. पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी सकाळी दहाच्या सुमारास ही भेट झाली. पवारांची एमसीएच्या अध्यक्षपदी सलग तिस-यांदा निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी या भेटीनंतर दिली. मात्र, या बड्या नेत्यांत सध्या सुरु असलेल्या या प्रकरणाबाबत नक्कीच चर्चा झाली असणार यात वाद नाही.

दरम्यान, आम्ही कायद्याचे बोट हातात धरून भुजबळांच्या पाठीशी आहोत. सरकार आम्हाला जेलमध्ये कधी टाकतेय याचीच वाट बघतोय. मी ही गृहमंत्री म्हणून अनेक वर्षे काम पाहिले आहे. सरकारचे कामकाज कसे चालते हे मी कोळून प्यालो आहे. जो विभाग चौकशी करीत आहे तो चुकीची आकडेवारी देत आहे. ती ही माध्यमापर्यंत पोहचवली जात आहे. अशी चौकशीची पद्धत असू शकते का? या सर्व प्रकारामुळे ही कारवाई राजकीय व सूडबुद्धीने सुरु असल्याचे वाटल्याशिवाय राहत नाही अशी पहिली प्रतिक्रिया शरद पवारांनी भुजबळ प्रकरणावर दिली आहे.
छगन भुजबळ राज्यातील मुरब्बी व अनुभवी नेते आहेत. सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत खांद्याला खांदा लावून काम केल्यानंतर 90च्या दशकात मंडल आयोगाला बाळासाहेबांनी विरोध केल्याने ओबीसी समाजाचे नेते असलेले भुजबळ सेनेतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी पवारांची सोबत केली. पवारांनीही भुजबळ यांचा योग्य सन्मान राखत त्यांना उपमुख्यमंत्रीपदासह गृहमंत्रीपदापर्यंत पोहचवले. मात्र, पवारांनी 5 वर्षापूर्वी भुजबळांना डावलून पुतण्या अजित पवारांना उपमुख्यमंत्री बसविले.
तेव्हापासून भुजबळ राष्ट्रवादीशी फटकून वागत आहेत. यानंतरच्या काळात भुजबळाचे पवारांशी संबंध दुरावत गेले आहेत. या दुराव्याची परिणिती म्हणून गेले अनेक दिवस भुजबळ स्वत:हून पवारांना भेटावयास गेले नसल्याची चर्चा आहे. या कारणामुळे ‘मोठे साहेब’ही चांगलेच दुखावले गेले. भुजबळ भेटत नसल्याचे दु:ख पवारांनी काही जवळच्या लोकांसमोर व्यक्तही केले आहे. तरीही हे दोन्ही ज्येष्ठ नेते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दोघे आपले संबंध उत्तम असल्याचे दाखवत असले तरी पवारांचा अहम भुजबळांनी दुखावला हे मात्र लपून राहिलेले नाही.
बिहारमध्ये समता परिषदेच्या माध्यमातून मोठे काम करूनही भुजबळांच्या खास लोकांना नेहमीच महत्त्वाच्या पदांपासून दूर ठेवण्यात आले आणि त्यांना तिकिटे नाकारण्यात आली. अलीकडे पटणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन झाले तेव्हाही भुजबळांच्या बिहारमधील समर्थकांना दूर ठेवण्यात आले होते. गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वीच भुजबळांनी शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, उद्धव ठाकरेंनी याबाबतचा निर्णय न घेता सावध खेळी केली होती.
अखेर भुजबळांचा शिवसेनेत जाण्याचा डाव फसला होता. त्यामुळे पवार आता भुजबळांना अडचणीत आणून त्याचे उट्टे काढत असल्याची चर्चा आहे. मात्र, सध्याच्या राजकीय स्थिती पाहता व त्यांच्यावरील घोटाळ्यांचे आरोप पाहता अन्य महत्त्वाच्या पक्षातही त्यांना राजकीय भवितव्य नसल्याने सध्या तरी भुजबळांसमोर राष्ट्रवादीत राहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे किमान आता तरी त्यांनी ‘थोरल्या साहेबां’शी जुळवून घेण्याचे ठरविल्याचे आजच्या घडामोडीतून दिसत आहे. त्यामुळेच आजच्या पवार- भुजबळांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पुढे वाचा...'समता परिषदे'तर्फे आजपासून राज्यभर आंदोलन... चौकशीनंतर छगन भुजबळ यांनी दिलेला खुलासा जसाचा तसा...