आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांशी संबंधितांवर \"ईडी\'चे मुंबईत धाडसत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गेल्या आठवड्यात राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर १६ ठिकाणी छापे टाकल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानेही(ईडी) आपली कारवाई अधिक वेगवान केली आहे. छगन भुजबळ यांच्याशी संबंधित मुंबई आणि परिसरातील विविध ठिकाणी ‘ईडी’ने सोमवारी छापे टाकले.

भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी गेल्या आठवड्यात ‘ईडी’ कडे तक्रार केली होती आणि भुजबळांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली होती.

महाराष्ट्र सदन प्रकरणी ‘ईडी’ने गेल्या आठवड्यात छगन भुजबळांविरोधात दोन ‘इन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट’ (ईसीआयआर) दाखल केले आहेत. गुन्हेगारी दंड विधान संहितेनुसार पोलिसांकडून दाखल करण्यात येणार्‍या एफआयआरएवढेच महत्त्व ईसीआयआरला आहे. सक्तवसुली संचालनालयाकडून दाखल झालेला गुन्हा असेच याला म्हटले जाते.

भुजबळ यांच्याविरुद्ध ९०० कोटी रुपयांचे अवैध व्यवहार केल्याचा आरोप आहे. भुजबळ यांच्या ‘आर्मस्ट्रॉंग एनर्जी’ कंपनीने सिंगापूर येथे ज्या कंपनीत गुंतवणूक केली त्या कंपनीतील चार जणांनाही ‘ईडी’ने समन्स बजावले आहेत.

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामातील गैरव्यवहारांप्रकरणी चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने विशेष तपास पथक नेमले आहे. ‘ईडी’ही या विशेष तपास पथकाचा भाग आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळ यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याची प्रत ‘ईडी’ने मागवून घेतली होती. त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारे भुजबळांविरोधात ईसीआयआर दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या खासगी कंपन्यांनी ११ प्रकरणांत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या आरोपाचा एसीबी आणि ईडीच्या अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने १८ डिसेंबर २०१४ ला दिले होते.

‘ईडी’नेनोंदवलेले दोन गुन्हे असे :
पहिला गुन्हा महाराष्ट्र सदन घोटाळा आणि कलिना जमीन वाटपाशी संबंधित आहे, तर दुसरा गुन्हा नवी मंुबईतील एका गृहनिर्माण प्रकल्पाशी संबंधित आहे. भुजबळ कुटुंबीयांच्या मालकीच्या रिअॅल्टी कंपनी प्रवर्तित खारघर येथील ‘हेक्स वर्ल्ड’ प्रकल्पात २३०० जणांनी २०१० मध्ये बुकिंग रक्कम म्हणून फ्लॅटच्या एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम विकसकाला दिली होती. चार वर्षे वाट पाहूनही प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने २५ ते ३० जणांच्या गटाने बांधकामाला विलंब होत असल्याची तक्रार करत न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरून नवी मुंबई पोलिसांनी भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

तपास अहवालासाठी हायकोर्टाची दोन महिन्यांची मुदत :
ईसीबीने भुजबळ, त्यांचे पुत्र आमदार पंकज आणि पुतण्या माजी खासदार समीर यांच्या मालकीच्या मुंबईतील सात मालमत्ता, ठाण्यातील दोन, नाशिकमधील पाच आणि पुण्यातील दोन मालमत्तांवर छापे टाकले होते. या प्रकरणी भुजबळ यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास पूर्ण करावा आणि अंतरीम अहवाल २२ जुलैला तर अंतिम अहवाल १९ ऑगस्टला द्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने १८ जूनला एसीबीला दिले होते.
बातम्या आणखी आहेत...