आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना आता मिळणार चकटफू टॅब, मोबाइलही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आधुनिक तंत्रज्ञानाची दोरी खेड्यापाड्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आता सर्व सरकारी शाळांमधील 90 लाख विद्यार्थ्यांना सरसकट मोबाइल फोन आणि टॅब्लेट पीसी मोफत देण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. याबाबतची योजना सध्या सरकारच्या विचाराधीन असून त्याची अंमलबजावणी झाल्यास तिजोरीवर जवळपास 10 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल.

दूरसंचार आयोगाची ही संकल्पना आहे. या योजनेला मान्यता मिळाल्यास हा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या प्रस्तावित योजनेत मोफत मोबाइल फोन वितरणाचा ग्रामीण भागातील 2.5 कोटी व्यक्तींना तर मोफत टॅब्लेट कार्यक्रमाचा अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

मोबाइल फोन चकटफू देताना त्या अनुषंगाने येणार्‍या अन्य सुविधा देखील देण्यात येणार आहेत. त्यानुसार दरवर्षी 360 रुपये याप्रमाणे दोन वर्षे मोफत रिचार्ज करून दिले जातील. यात 30 मिनिटांचा टॉकटाईम, 30 एसएमएस आणि इंटरनेटचा आनंद घेण्यासाठी 30 एमबी नेट सुविधादेखील देण्यात येणार आहे.

मोबाइलप्रमाणेच टॅब्लेट पीसीमध्ये देखील सिम, 500 एमबीपर्यंत इंटरनेट वापर, 75 रुपयांचा टॉकटाइम आणि विशिष्ट कालावधीसाठी 75 एसएमएस अशा पॅकेजचा समावेश आहे.

टॅब्लेट पीसी मोफत वितरण कार्यक्रम राबवण्यासाठी एकूण खर्च 4,972.5 कोटी रुपये असून त्यामध्ये वैश्विक सेवा जबाबदारी निधीतून एकूण खर्चाच्या 60 टक्क्यांपर्यंत निधी देण्यात येणार आहे. उदा : ग्रामीण भागातील पात्र विद्यार्थ्यांसाठी 2,983.5 कोटी रुपये आणि दूरसंचार खात्याकडून एकूण खर्चाच्या 40 टक्के निधी उदा. शहरी भागातील पात्र विद्यार्थ्यांसाठी 1,989 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

मोफत मोबाइल योजना प्रामुख्याने ‘मनरेगा’ कामगारांसाठी असून ती राबवण्यासाठी केंद्र सरकारला 4,850 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. या मोबाइलचे वितण सहा वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. अंतिम खर्च हा निविदा प्रक्रियेवर आधारीत असेल. मंत्रिमंडळाकडून अंतिम निर्णय घेण्या अगोदर या दोन योजनांसाठी दूरसंचार खात्याला दूरसंचार आयोगाकडून मान्यता मिळावी लागेल.

ही योजना सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय दूरसंचार निगम लि.च्या मार्फत राबवली जाणार असून मोबाइल फोम आणि टॅब्लेटसाठी कंपनीच निविदा काढणार आहे.

टॅब्लेट पीसीचे वितरण तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात हा टॅब 15 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणार असून दुसर्‍या आणि तिसर्‍य टप्प्यात अनुक्रमे 35 लाख आणि 40 लाख विद्यार्थ्यांंपर्यंत तो जाईल.

या प्रस्तावित योजनेमध्ये विद्यार्थ्यांंना शालेय शिक्षण घेताना टॅब्लेट पीसी मिळणार आहे. मोबाइल फोन आणि टॅब्लेट पीसी या दोघांनाही तीन वर्षांंची वॉरंटी असेल. मोबाइल फोन योजनेत पहिल्या वर्षात 25 लाख दुसर्‍या वर्षात 50 लाख तर तिसर्‍या आणि चौथ्या वर्षात अनुक्रमे 75 लाख आणि एक कोटी लाभार्थ्यांपर्यंत ती पोहचेल.

सरकारचे इलेक्शन पॅकेज?
मेमध्ये निवडणुकीची शक्यता आहे. त्यामुळे हा सरकारचा इलेक्शन फंडा मानला जात आहे. योजनेला मंजुरी मिळाल्यास पुढील वर्षी मार्चनंतर ती लागू होईल. चीननंतर दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारतात मोबाइल आणि टेलिफोन ग्राहकांची संख्या आताच 90.3 कोटी आहे.