आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Challenges Before Mobilizing People To Raj Thakre : Vist Marathwada

उद्धव ठाकरेंच्या सभेने मनसेला धसका; राजसमोर गर्दी जमविण्याचे आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील जालन्यात घेतलेल्या पहिल्याच सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता दुष्काळी प्रश्न हाती घेऊन राज्याच्या दौ-यावर निघालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर त्यापेक्षा जास्त गर्दी जमविण्याचे आव्हान आहे. राज यांचीही जालन्यात सभा होणार असून त्यासाठी शिवसेनेपेक्षाही जास्त गर्दी जमविण्याचे आदेश मनसैनिकांना देण्यात आले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या दौ-याला सुरुवात करताना पहिल्या सभेसाठी दुष्काळग्रस्त मराठवाड्याची निवड केली. जालन्यात त्यांच्या सभेला दोन लाखांच्या आसपास गर्दी जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मराठवाड्यात शिवसेनाप्रमुखांप्रमाणेच उद्धव यांनाही प्रतिसाद मिळत असल्याचे तर्क लढविले जात आहेत.
मनसेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांचाही पुढील रविवारपासून महाराष्ट्राचा दौरा सुरू होत आहे. राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी जमते. त्यांच्या वक्तृत्वावर सर्वच प्रचंड खुश असतात. मात्र उद्धव ठाकरे यांनी जालन्यात जी अभूतपूर्व सभा घेतली त्यापेक्षा मोठी सभा घेण्याचे आव्हान आता मनसेसमोर उभे आहे. त्यासाठी मुंबई, नाशिकमधील नेते कामाला लागले आहेत.

राज ठाकरे यांची दोन मार्च रोजी जालना येथे सभा होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सभेपेक्षा मोठी गर्दी झाली पाहिजे असे आदेश मनसे पदाधिका-यांना देण्यात आले आहेत. एक महिना हाताशी असल्याने सर्व प्रयत्न करून राज यांची सभा भव्य दिव्य होईल याची काळजी घेण्याचे मराठवाडा व विदर्भातील नेत्यांना वरिष्ठ पातळीवरून कामाला लागा, असे आदेश देण्यात आल्याची माहितीही मनसेतील सूत्रांनी दिली.

बाळासाहेबांची पुण्यतिथी, मनसेचा अभिमान दिवस
मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी आपल्या मतदारसंघात कॅलेंडर वाटप केले आहे. त्यात सर्व सण आणि मनसे पदाधिका-यांच्या वाढदिवसांबरोबरच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचाही उल्लेख करण्यात आहे. विशेष म्हणजे या कॅलेंडरमध्ये 17 नोव्हेंबर या दिवसाला विशेष अधोरेखित करत त्या पानावर बाळासाहेबांचा फोटो व त्याखाली ‘अभिमान दिवस’ अशी नोंद करण्यात आली आहे.