आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेट्टी, जानकरांचे खच्चीकरण करण्यात चंद्रकांतदादा सक्रिय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष या मित्रपक्षांना सत्तेवर आल्यापासून भाजप काडीचीही किंमत देत नाही. केवळ मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर दाखवून त्यांना झुलवत ठेवायची व दुसरीकडे या छाेट्या पक्षांची ताकद संपवायची, अशी व्यूहरचना भाजपने केली आहे. त्यासाठी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील सक्रिय असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याचे हे एक मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे.

शेट्टी व जानकर यांच्या पक्षांची पश्चिम महाराष्ट्रात मोठी ताकद आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर येथे पक्षाचे चांगले काम असून निवडणुकांतही दोन्ही पक्षांनी चांगले यश मिळवले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांच्या ताकदीवर भाजपला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गडांमध्ये शिरकाव करता आला. मात्र आता या दोन्ही पक्षांना मंत्रिपदे दिल्यास त्यांची ताकद आणखी वाढेल, अशी भीती भाजपला वाटत आहे. विशेषत: सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपच्या पश्चिम महाराष्ट्राची धुरा असल्याने त्यांना ही भीती वाटत असल्याची चर्चा आहे. पाटील यांचा संपर्क थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी संपर्क आहे. आता मंत्रिमंडळ विस्तारात स्वाभिमानी व रासपला स्थान दिल्यास भविष्यात त्याचा ताेटा भाजपलाच हाेऊ शकताे, हे शहांच्या मनावर बिंबवण्यात पाटील यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराला केंद्रीय नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळत नसल्याचीही चर्चा आहे.

‘भाजप तुमचा उपयोग करेल. नंतर खड्यासारखे बाजूला करेल, असे िशवसेनेेचे नेते आम्हाला सांगत होते. ज्या भाजपने शिवसेनेबरोबरची २५ वर्षांची मैत्री एका फटक्यात मोडून काढली ते तुम्हालाही फार किंमत देणार नाहीत, हे शिवसेनेचे म्हणणे आता पटत आहे,’ असे जाहीर सभेत सांगून शेट्टी व सदाभाऊ खाेत यांनी नाराजी प्रकट केली हाेती. तसेच ‘आता विस्तार झाला काय िकंवा नाही, आम्हाला काही फरक पडत नाही. आमची ताकद भाजपला दाखवून देऊ,’ असा इशारा जानकरांनीही दिला आहे.