आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद: उमेदवार कोण यावर ठरवू पाठिंबा द्यायचा की नाही- उद्धव ठाकरेंचा भाजपला बाऊन्सर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यासाठी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी थेट मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांना साकडे घातले. भाजपच्या उमेदवाराला शिवसेनेने समर्थन द्यावे अशी मागणी त्यांनी शिवसेना नेतृत्त्वाकडे केली. यावर तुमचा उमेदवार कोण अशी विचारणा शिवसेनेने केल्याचे समोर येत आहे. याबाबत लवकरच उमेदवाराचे नाव जाहीर करू असे चंद्रकांतदादांनी सांगितले.

 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने येत्या 7 डिसेंबर रोजी ही पोटनिवडणूक होत आहे. यासाठी 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. या प्रक्रियेसाठी आता केवळ सहा-सात दिवस राहिल्याने या घडामोडीला वेग आला आहे. दरम्यान, भाजपने शिवसेनेशी संपर्क साधल्याने राणे यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आता भाजपकडून माधव भंडारी, शायना एनसी, प्रसाद लाड आदींची नावे चर्चेत आहेत.

 

शिवसेनेने पाठिंबा दिल्याशिवाय आपला उमेदवार निवडून आणणे कठिण आहे याची जाणीवला भाजपला आहे. त्यामुळेच राणेंनी सुद्धा माघार घेतल्याचे समजते. राणे नसतील तर शिवसेना भाजपला पाठिंबा देईल व काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत कोणत्याही स्थितीत जाणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांना असल्यानेच त्यांनी चंद्रकांतदादा आणि तावडेंना वाटाघाटीसाठी मातोश्रीवर धाडले आहे.

 

सत्ताधारी भाजपकडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या नावाची चर्चा होती मात्र, त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता भाजपकडून उमेदवार कोण यावर खल सुरू आहे. प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आणि पक्षाच्या कोषाध्यक्षा, प्रवक्‍त्या शायना एनसी, प्रसाद लाड यांची नावे समोर येत आहेत. मात्र, पक्ष ऐनवेळी एखादे नवेच नाव समोर आणू शकतो.

 

राणे यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देताना काँग्रेस पक्षामुळे मिळालेली विधान परिषदेतील आमदारकीही सोडली होती. या जागेवर पुन्हा निवडून जाण्याचा राणेंचा प्रयत्न होता. मात्र, शिवसेनेने कडवा विरोध केल्याने व काँग्रेस-राष्ट्रवादीची या निवडणुकीसाठी आघाडी होत नसल्याने राणे यांनी थांबणे पसंत केले आहे. विधानसभेत वैभव नाईकांकडून पराभव झाल्यानंतर वांद्रे पोटनिवडणुकीतही राणेंना पराभवाची चव चाखावी लागली होती. आता सेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येत असल्याचे पाहून राणेंनी आणखी एक पराभव नको म्हणून माघार घेणे पसंत केले आहे. दरम्यान, राणेंनी माघार घेताच भाजपकडून इच्छूकांची नावे समोर येऊ लागली आहेत. यात माधव भांडारी, शायना एनसी, रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, माजी आमदार प्रमोद जठार आदींच्या नावांची चर्चा आहे. मात्र, शिवसेनेने पाठिंबा दिल्यास आणि घोडा बाजार होणार नसेल तर भंडारी किंवा शायना यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते अशी भाजपमध्ये चर्चा आहे.

 

उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीबाबत काय म्हणाले चंद्रकांतदादा...

 

चंद्रकांतदादा आणि विनोद तावडे यांनी उद्धव ठाकरे यांची आज दुपारी १ च्या सुमारास भेट घेत सुमारे दीड तास चर्चा केली. याभेटीबाबत चंद्रकांतदादा म्हणाले, उद्धव ठाकरे आणि माझे जुने संबंध आहेत. आजच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. मात्र, पक्षाने मला जे काम दिले होते त्याबाबत चर्चा केली. इतर गोष्टीच्या खोलीत मी जात नाही. भाजपने विधानपरिषदेसाठी राणेऐवजी दुसरा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राणे मंत्रिमंडळात भविष्यात येणारच नाहीत असे आताच सांगणे शक्य नाही. भाजपने दिलेल्या उमेदवाराबाबत पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय सांगू असे उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचेही पाटलांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे उद्यापासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. त्यावेळी मी त्यांना तुम्ही दोघे एकाच विमानात जा अशी विनंती केली. मात्र, उद्धव ठाकरेंनी यावेळी ते शक्य नसल्याचे सांगितले. उद्धवजी यांचे कोल्हापूरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मी स्वागत करेन असेही एका प्रश्नांवर चंद्रकांतदादांनी सांगितले. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, माधव भंडारी, शायना एनसी यांच्याऐवजी इतरांना का मिळू शकते संधी...

बातम्या आणखी आहेत...