आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसप्रमाणे भाजपही खेळवतोय नारायण राणेंना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन काँग्रेसने दिले, परंतु ते पूर्ण न केल्याने नाराज नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली. महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. ‘एनडीए’च्या सोबत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यांना मंत्रिपद देतो, असे आश्वासन भाजपने दिले. परंतु ते पूर्ण न झाल्याने आणि विधान परिषदेच्या निवडणुकीस उभे न केल्याने राणे अाणखीनच नाराज झाले. काँग्रेसप्रमाणेच भाजपही खेळवतोय का? असा प्रश्न त्यांच्या मनात उद््भवत असल्यास नवल वाटायला नको. 


काँ ग्रेसमध्ये घुसमट होत असून दिलेला शब्द पाळला जात नाही म्हणून नाराज झालेल्या नारायण राणे यांनी भाजपचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली होती. मात्र नारायण राणे नावाचे विकतचे दुखणे घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार नव्हते. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये घेण्याऐवजी वेगळी चूल मांडण्याचा सल्ला देण्यात आला. वेगळी चूल मांडून मंत्रिपद देऊ, असे आश्वासन मिळाल्याने नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष स्थापन केला आणि ‘एनडीए’ला पाठिंबा देत असल्याचे घोषित केले. आपण दुकान सुरू करीत असून दुकानात लवकरच ग्राहक येतील, असे पक्षाची स्थापना करताना त्यांनी सांगितले होते. मात्र त्यांच्या दुकानात भाजपरूपी ग्राहक आला खरा, परंतु काहीही खरेदी न करता फक्त विंडो शॉपिंगच करीत असल्याचेच दिसून आले. नारायण राणे यांना विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजप मदत करील असे म्हटले जात असताना राणेंचा पत्ता कट करून राष्ट्रवादीतून बंडखोरी करून भाजपमध्ये आलेल्या प्रसाद लाड यांना भाजपने उमेदवारी दिली आणि राणे यांना पुन्हा एकदा नवे आश्वासन देण्यात आले. 


नारायण राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर सात डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. नारायण राणे अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज भरतील अशी हवा भाजपने पद्धतशीरपणे तयार केली. मात्र नारायण राणे यांना उमेदवारी दिल्यास शिवसेना मदत करणार नाही आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येऊन राणे यांचा पराभव करतील अशी गणिते तयार होऊ लागली. त्यामुळेच भाजपने आपला उमेदवार उभा करून परिषदेत आपली ताकद एकने वाढवण्याचा निर्णय घेतला. भाजप निष्ठावंत माधव भंडारी, शायना एनसी, प्रमोद जठार आणि प्रसाद लाड यांची नावे पुढे करण्यात आली. नारायण राणे यांनाही याची कुणकुण लागलीच होती. तरीही पुन्हा एकदा सर्वपक्षीय मित्रांच्या पाठिंब्यावर निवडून येऊ, असा थोडा विश्वास त्यांना वाटत होता म्हणून त्यांनी रविवारी बैठकांचा सिलसिला लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली. मात्र ही निवडणूक सोपी नाही. त्यामुळे तुम्ही निवडणूक लढवू नका. मंत्रिमंडळ विस्तारात तुम्हाला स्थान दिले जाईल आणि पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत निवडून आणले जाईल असे सांगण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री हे नारायण राणे यांच्या गळी नवीन सूत्र उतरवण्यात यशस्वी ठरले आणि त्यांनी माघार घेतली. 


मात्र नारायण राणे यांचा पत्ता कट करीत असतानाच भाजपने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांप्रमाणे निष्ठावंतांऐवजी आयात उमेदवाराच्या पारड्यात वजन टाकले आणि निष्ठावंत माधव भंडारी, शायना एनसी आणि प्रमोद जठार यांच्याऐवजी राष्ट्रवादीतून बंडखोरी करून भाजपवासी झालेल्या प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीमध्ये असताना अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे प्रसाद लाड यांनी गेल्या वर्षी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून विधान परिषद निवडणूक लढवली. या निवडणुकीत काँग्रेसच्या भाई जगताप यांच्याकडून फक्त २ मतांनी हार पत्करावी लागली. या पराभवानंतर त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. भाजपमध्ये आल्याबरोबर त्यांची मुंबई उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. भाजपमध्ये आल्यानंतर ते अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ गेले आणि त्यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाऊ लागले. मुख्यमंत्र्यांच्या नजीकच्या वर्तुळात समावेश झाल्यानेच त्यांना परिषदेचा प्रसाद मिळाला.  


प्रसाद लाड यांना रविवारी रात्री तिकीट देण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांनी लगेचच मध्यरात्री मातोश्रीचे दरवाजे ठोठावले. भरमध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. पाठिंब्याची मागणी केली आणि शिवसेनेनेही लगेचच पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर पहाटे वर्षावर पोहोचले आणि लिखित करार केला. भाजपचे १२२ आमदार आणि शिवसेनेचा पाठिंबा त्यामुळे प्रसाद लाड यांचा विजय निश्चित असून परिषदेतील भाजपच्या संख्येत आता एकने वाढ होणार आहे. 

 
प्रसाद लाड यांना तिकीट मिळाल्याने भाजपचे निष्ठावंत जसे नाराज झाले आहेत तशीच नाराजी एक प्रकारे नारायण राणे यांच्याही मनात उद््भवली आहे. काँग्रेसमध्ये असताना ज्या प्रकारे तारीख पे तारीखच्या धर्तीवर आश्वासनांची खैरात केली जात असे तसेच भाजपही करू लागला आहे.  मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल आणि त्यात समावेश केला जाईल, असे नारायण राणे यांना सांगण्यात आले होते. परंतु लवकरची वेळ अजून तरी आलेली नाही. प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नारायण राणे यांना कोणतेही आश्वासन दिलेले नाही मात्र त्यांचा मंत्रिमंडळात लवकरच समावेश केला जाईल, असे पुन्हा एकदा म्हटले आहे. नागपूर येथे ११ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होतो का? याकडे नारायण राणे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. 


राणे अजून प्रतिक्षा यादीवरच 
प्रसाद लाड यांना तिकीट मिळाल्याने भाजपचे निष्ठावंत जसे नाराज झाले आहेत तशीच नाराजी एक प्रकारे नारायण राणे यांच्याही मनात उद््भवली आहे. काँग्रेसमध्ये असताना ज्या प्रकारे तारीख पे तारीखच्या धर्तीवर आश्वासनांची खैरात केली जात असे तसेच भाजपही करू लागला आहे.  मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल आणि त्यात समावेश केला जाईल, असे नारायण राणे यांना सांगण्यात आले होते. परंतु लवकरची वेळ अजून तरी आलेली नाही. 
 

- चंद्रकांत शिंदे, ब्युरो चिफ, मुंबई

बातम्या आणखी आहेत...