आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Change The Rule For The Water , Fodder : Demanding Marathwada Region's Ministry

पाणी, चा-यासाठीच्या नियमांत बदल करा : मराठवाड्याच्या मंत्र्यांची आग्रही मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठवाड्यातील भीषण दुष्काळ पाहता माणशी पाणीपुरवठा व जनावरांच्या चा-यासाठी दिली जाणारी रक्कम वाढवून देण्याची आग्रही मागणी या भागातील मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी केली. पाणीवाटपाचे निकष ठरवताना जुन्या नियमांत जनावरांचा विचारच झालेला नसल्याने हे नियम बदलण्यात यावेत, असा आग्रह राजेश टोपे, मधुकर चव्हाण आणि जयदत्त क्षीरसागर यांनी धरला.


सध्या नियमानुसार दररोज माणशी 20 लिटर पाणी देण्याची तरतूद आहे. यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला किमान 30 लिटर पाणी देण्यात यावे. तसेच, जनावरांच्या चा-यासाठी सध्या मिळत असलेल्या 60 रुपयांऐवजी 80 रुपये देण्यात यावेत, असे या मंत्र्यांचे म्हणणे होते. दरम्यान, जुने नियम बदलण्यास मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी विरोध केला.


जालन्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून लोकांना अधिक पाणी मिळाले पाहिजे, असे टोपे म्हणाले. मात्र केवळ यासाठी जुने नियम बदलण्यास मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी विरोध केला. सध्याचा दुष्काळ भीषण असून त्यासाठी नियम शिथिल करण्यास हरकत नसावी, असा मुद्दा टोपे यांनी उपस्थित केला.


खासगी विद्यापीठांत 50 % आरक्षण
खासगी विद्यापीठ कायद्याचा संमत केलेला मसुदा मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता नव्या खासगी विद्यापीठाला आपला स्वतंत्र कायदा दोन्ही सभागृहांत मंजूर करून घ्यावा लागणार आहे. त्यात अशा प्रत्येक विद्यापीठाला राज्य सरकारच्या धोरणानुसार प्रवेश प्रक्रियेत 50 टक्के आरक्षणाची तरतूद सक्तीची असेल.


प्राध्यापकांबाबत निर्णय 20 रोजी?
संपावरील प्राध्यापकांना 20 एप्रिलला प्रलंबित 1500 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली. वित्त विभागाने एकाच वेळी उर्वरित सर्व रक्कम देण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, फरकाच्या रकमेची त्यांची मागणी पूर्ण होत असेल तर नेट-सेटची अट शिथिल करू नये, अशी चर्चा बैठकीत झाल्याचे समजते.