आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली ते आठवीपर्यंतच्या सेमी इंग्रजी शाळांच्या अध्यापन पद्धतीत बदल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सेमी इंग्रजी शाळांच्या अध्यापन पद्धतीत यंदापासून काही बदल करण्यात आला आहे. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणित आणि इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे विषय ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी भाषेतून शिकवण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिक्षण विभागाने 19जूनला तसा आदेश दिला असून, 2013-14 या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.


मराठी माध्यमाच्या मुलांची इंग्रजीची भीती कमी व्हावी म्हणून राज्यात 2004 पासून सेमी इंग्रजी सुरू झाले. 5वी ते 7वीपर्यंत गणित व विज्ञान इंग्रजीतून शिकवले जात होते. 2007मध्ये पहिली ते चौथीपर्यंत तेच विषय इंग्रजीतून शिकवले जाऊ लागले. त्यानंतर 2012 मध्ये अभ्यासक्रम बदलल्यावर पहिली-दुसरीच्या परिसर अभ्यास विषयातील आशय भाषा व गणित विषयात तर तिसरी ते पाचवीच्या सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांचा आशय परिसर अभ्यास भाग 1 व 2 मध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे प्रचलित सेमी इंग्रजी पद्धतीत बदल करणे गरजेचे होते, असेही आदेशात नमूद आहे.


अतिरिक्त शिक्षक नाही
विषयांसाठी अतिरिक्त शिक्षकांची पदे भरता येणार नाहीत. शिक्षण अधिकार अधिनियमातील तरतुदींनुसार प्राथमिक शिक्षकांकरता इयत्ता पहिली ते 8वीच्या शिक्षकांची अर्हता व शैक्षणिक पात्रता परीक्षा अनिवार्य आहे. सेमी इंग्रजी शाळांनाही हीच पात्रता लागू राहील.


सक्ती नको, विषय ऐच्छिक : संबंधित शाळेची इंग्रजीतून विषय शिकवण्याची क्षमता व पालकांची इच्छा पाहून हे विषय इंग्रजीतून शिकवले जावेत. त्यासाठी सक्ती करण्यात येऊ नये, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.


इंग्रजीतून डी.टी.एड. हवे
संबंधित शाळेकरिता मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदविकाधारक असणे आवश्यक आहे, असेही आदेशात नमूद आहे. हे विषय शिकवणा-या शिक्षकांना शाळेच्या विनंतीनुसार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (पुणे) यांच्याकडून प्रशिक्षणही देण्यात येईल.