आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील काँग्रेसमध्येही बदलाचे वारे, तरुण चेह-यांना संधी मिळण्याची चिन्हे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्यातील बहुतांश सर्व पक्षांनी संघटनात्मक बदल सुरू केले आहेत. राष्ट्रवादीसारख्या पक्षांनी तर मंत्रिमंडळातही बदल केले आहेत. त्यापाठोपाठ आता काँग्रेसमध्येही बदल होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. पावसाळी अधिवेशनात ‘आदर्श’चा चौकशी अहवाल मांडल्यानंतर काँग्रेसमध्ये फेरबदल होण्याची शक्यता एका ज्येष्ठ मंत्र्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. मात्र मुख्यमंत्रिपदी पृथ्वीराज चव्हाणच राहणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.


भाजपने आपली धुरा तरुण नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीने भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड यांच्या खांद्यावर सोपवली आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी या पक्षांनी ही पावले उचलली आहेत. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुंबई अध्यक्ष जनार्दन चांदूरकर हे प्रौढ असल्याने तरुणांना आकर्षित करणे काँग्रेसला कठिण जात असल्याचे बोलले जाते. त्यातच माणिकराव ठाकरे हे मंत्रिमंडळात येण्याकरिता उत्सुक आहेत.
काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी चांगले संबंध असल्याने त्यांची वर्णी निश्चि मानली जाते.


माणिकराव ठाकरेंचे दिल्लीत वजन वाढले
मोहन प्रकाश यांच्याकडून महाराष्ट्राचे प्रभारीपद काढून घ्यावे यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थकांनी दिल्लीत फिल्डिंग लावली होती. मात्र मोहन प्रकाश यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीसपदी बढती देऊन त्यांच्याकडे महाराष्ट्राचा भार तसाच ठेवण्यात आला, शिवाय मध्य प्रदेश व मिझोराम ही दोन निवडणुका येऊ घातलेली राज्येही देण्यात आली. त्यामुळे माणिकरावांचे काँग्रेसमधील वजन आपोआप वाढल्याचे बोलले जात आहे.


जनतेच्या प्रतिक्रियांवर फेरबदल अवलंबून, हायकमांडही राजी
यापूर्वी प्रत्येक अधिवेशनापूर्वी काँग्रेसमध्ये फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, परंतु तसे घडले नव्हते. त्याच पद्धतीने या वेळीही पुन्हा जाणूनबुजून याची चर्चा केली जात असल्याचे काँग्रेस नेत्यांच्या निदर्शनास आणले असता, आता फेरबदल करण्यासाठी एकमेव संधी आहे. कारण लवकर फेरबदल न झाल्यास पुढे लोकसभा निवडणुकांचे वारे जोरदार वाहण्यास सुरुवात होईल व हातची संधी निघून जाईल, त्यामुळे हायकमांडने सकारात्मक सिग्नल देण्यास सुरुवात केली असल्याचे काँग्रेसमधील ज्येष्ठ मंत्र्याचे म्हणणे आहे. पावसाळी अधिवेशनात ‘आदर्श’चा अहवाल मांडला जाणार आहे. हा अहवाल मांडल्यानंतर त्याच्यावर जनतेतून व प्रसारमाध्यमातून काय प्रतिक्रिया येतात त्या पाहून काँग्रेसमध्ये फेरबदल केले जाणार असल्याचे ज्येष्ठ मंत्र्यांचे म्हणणे आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीची उद्धव यांच्यावर टीका
शिवसेनेच्या वर्धापन दिनी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा आज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून चांगलाच समाचार घेण्यात आला. रेसकोर्सच्या मुद्द्यावरही दोन्ही सत्ताधारी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली.
रेसकोर्सची जागा 40 दिवस शर्यतींसाठी वापरली जाते. बाकीचे 320 दिवस ती सर्वसामान्यांसाठी खुली असते, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. त्याउलट पालिकेच्या जागेवर उभा राहिलेला मातोश्री क्लबवर मात्र सर्वसामान्यांना प्रवेश बंद असल्याचे ते म्हणाले. याआधीही खेळाची मैदाने, मोकळ्या जागा हडपण्याचा शिवसेनेचा डाव विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना हाणून पाडला होता, असे त्यांनी सांगितले.


काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेनेच्या निवडणूक जाहीरनाम्याची आठवण करून देत तो अद्याप पूर्ण केलेला नसल्याचे सांगितले. त्यामुळे लोक शिवसेनेच्या थीमपार्कसारख्या आश्वासनांवर विश्वास कसा ठेवणार, असा सवाल त्यांनी केला. भायखळा येथील उद्यानाच्या जागी 2002मध्ये पक्षी उद्यान करण्याचे आश्वासन दिले नंतर 2007मध्ये आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाची घोषणा केली तेही पाळले नाही, अस आरोपही सावंत यांनी केला.