आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाळ्यातही ‘चार्‍याचा’ आधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात यंदा दमदार पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धरणेही भरली. तरीही काही भागात अजूनही दुष्काळ असल्याचे सांगत चार जिल्हय़ातील चारा छावण्या 31 ऑगस्टपर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.

गेल्या वर्षी दुष्काळामुळे चारा छावण्या सुरू करून सरकारने बहुतांश छावण्यांची सूत्रे नेत्यांच्या हाती दिली होती. चारा-पाण्याबरोबर निधीसाठी पळापळ, धावपळ करता करता पावसाळा सुरू झाला आणि मराठवाड्यातील चारा छावण्या बंद झाल्या. मात्र, पुणे, सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील 243 छावण्यांना मुदतवाढ देण्यात आली.

अतिवृष्टीचे 324 बळी, मदतीचे वाटप सुरु
राज्यात अतिवृष्टीचे आजवर 324 बळी गेले आहेत. विदर्भातील अतिवृष्टी आणि पुरामुळे 3 लाख 91 हजार 69 हेक्टर शेतीपिकांचे 50 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. 9 हजार 345 हेक्टर जमीन खरडून तर 753 हेक्टर जमीन वाहून गेली. मृतांच्या वारसांना मदतीचे वाटप सुरू झाले आहे. आत्तापर्यंत 196 मृत व्यक्तींच्या वारसांना मदतीचे वाटप केल्याचा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. कोकण, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद विभागातील पीक नुकसानीचे सर्वेक्षणही सुरू आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या धान पिकांसाठी 7 हजार 500 रुपये तर इतर पिकांसाठी 5 हजार रुपये प्रति हेक्टर मदत करण्यात येत आहे.

उस्मानाबाद जिल्हा वगळता 100 टक्के पाऊस
मराठवाड्यातील नोंदींनुसार उस्मानाबाद वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस आहे. पाणी योजना वीज बिले न भरल्यामुळे बंद असतील तर त्या 30 सप्टेंबरपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मराठवाड्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढत असून जायकवाडीत सध्या 16 टक्के पाणीसाठा आहे. विभागातील एकूण पाणीसाठा 37 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.