आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बंटी-बबली’ विरोधात अखेर गुन्हा दाखल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - व्यावसायिकाला कोट्यवधी रुपयांना गंडवणा-या बंटी-बबलीविरोधात अखेर मुंबईतील विनोबा भावेनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. न्यायालयाने बडगा उगारल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
मुंबईतील स्टीफन डिसुझा या उद्योजकाला दोन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप पुण्याच्या ब्रिजेश व ऊर्वी शाह या दांपत्यावर आहे. पोलिस आणि आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी दाद न दिल्यामुळे डिसुझा यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

डिसुझा यांचे कुर्ला बैलबाजारात एस. मार्केटिंग कॉल सेंटर आहे. तिथे सुमारे 55 कर्मचारी काम करतात. या कॉल सेंटरच्या माध्यमातून औषधी कंपन्यांची उत्पादने परदेशात विकण्याचे काम होते. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील पार्थवेब सोल्यूशन्स या शाह दांपत्याच्या कंपनीने डिसुझा यांच्याशी संपर्क साधून आपली उत्पादने कमिशनवर विकून द्यायचे कंत्राट दिले. त्यानुसार त्यांनी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करून दिला. सुरुवातीला काही महिने डिसुझा यांना शहा यांनी कमिशन दिले. मात्र, गेट वेच्या माध्यमातून येणारे पैसे आले नसल्याचे कारण देत शहा यांनी नंतर पैसे देण्यास नकार दिला. डिसुझा यांनी विचारणा केली असता पैसे आल्यावर देतो, असे सांगून शहा यांनी त्यांना बारा धनादेश दिले. मात्र, ते वटले नाहीत. शहा यांनी दरम्यानच्या काळात या कामाचे कंत्राटही दुस-या कंपनीला दिले. दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार दिली, परंतु पोलिसांनी दाद न दिल्यामुळे त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते.