मुंबई- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाने (आयसीएआय) सोमवारी चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. पहिल्या तीन ‘ऑल इंडिया टॉपर्स’मध्ये महाराष्ट्राच्या नंदुरबारमधील संतोष ननकानी याने स्थान मिळवले. महाराष्ट्रात संतोषने पहिला क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेचा एकूण निकाल फक्त 8.23 टक्के लागला आहे.
आयसीएआयने सीएचा अंतिम निकाल सोमवारी सायंकाळी ऑनलाईन जाहीर केला. ‘ऑल इंडिया टॉपर्स’मध्ये गुरगावचा विजेंदर अगरवाल हा 558 गुण (69.75 टक्के) मिळवून देशात पहिला आला. अहमदाबादची पूजा पारेख ही 556 गुण (69.50 टक्के) मिळवून दुसरी तर नंदूरबारचा संतोष ननकानी 553 (69.13 टक्के) आणि हावड्याची निकीता गोयल 553 (69.13 टक्के) या दोघांनी देशात संयुक्तपणे तिसरा रँक मिळवला. नोव्हेंबर 2014 मध्ये दोन ग्रुपमध्ये सीएची अंतिम परीक्षा झाली होती.
नंदूरबारसारख्या ग्रामीण भागातून संतोष ननकानीने मिळवलेले यश जबरदस्त आहे. नंदूरबार भागात पुणे, मुंबईसारख्या शैक्षणिक सेवा-सुविधा उपलब्ध नसतानाही संतोषने मिळवलेले यश खास मानले जात आहे.