आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chate Contest Loksabha From Beed, Mumbai; Entered In Aam Adami Party

लोकसभेसाठी बीड, मुंबईतून चाटे इच्छुक; आम आदमी पक्षात प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चाटे कोचिंग क्लासेसचे संचालक मच्छिंद्र चाटे यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर-पूर्व मुंबई किंवा बीड मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती चाटे यांनी ‘दिव्य मराठी’ला शुक्रवारी दिली.
चाटे यांच्या आम आदमी पक्षाने अद्याप कोणतीही महत्त्वाची जबाबदारी टाकलेली नाही. चाटे यांचा जनसंपर्क व अनुभव पाहता आम आदमी पक्ष त्यांना राज्य कमिटीवर घेण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे समजते.
उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघामधून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास मी इच्छुक आहे. या मतदारसंघात भाजपचे किरीट सोमय्या यांना हरवण्याची क्षमता माझ्यात आहे. परंतु पक्षाने सांगितले तर बीड मतदारसंघातूनसुद्धा लढण्यास तयार असल्याचे चाटे यांनी स्पष्ट केले.
उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या राष्‍ट्रवादी कॉँग्रेसचे संजय दिना पाटील खासदार आहेत. मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, भांडुप आणि मानखुर्द हा भाग या मतदारसंघात असल्यामुळे या मतदारसंघाला आपण पसंती दिल्याचे चाटे यांनी सांगितले.
गेल्या 25 वर्षांपासून चाटे क्लासेस नावाने ते राज्याला परिचित आहेत. या क्लासेसच्या राज्यात शंभरपेक्षा अधिक शाखा आहेत. ‘देवयानी मूव्हीज’ नावाची त्यांची चित्रपट निर्मिती संस्था असून काही वर्षांपूर्वी त्यांनी औरंगाबादेतून ‘लोकसंकेत’ नावाने वृत्तपत्रही सुरू केले होते.
आम आदमी पक्षाकडे सध्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातून इच्छुकांचे अनेक अर्ज आले आहेत. त्यांची सध्या छाननी सुरू आहे. चाटे यांचा उमेदवारीसाठी अर्ज आलेला असून त्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती आपच्या सूत्रांनी दिली.
उद्योगातील अनुभव दांडगा
आम आदमी पक्ष राज्यात सध्या मराठी चेह-याच्या शोधात आहे. चाटे मूळचे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आहेत. उद्योगातील त्यांचा अनुभव दांडगा आहे. आता चाटे ‘आप’मध्ये सहभागी झाल्याने या पक्षाला मराठवाड्यात पाठबळ मिळू शकते.
आजवरचा प्रवास
चाटे 2003 मध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्‍ट्रीय जनता दलामध्ये सक्रिय होते. 2009 मध्ये त्यांनी औरंगाबादेत मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतही प्रवेश केला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशीही चाटे यांचे जवळचे संबंध आहेत.