आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वास मतावेळी शिवसेनेचा सभात्याग, छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट, शिवसेनेकडून खंडन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निकालाच्या दिवशीच भाजपला विनाअट पाठिंबा जाहीर करणारी राष्ट्रवादी आता खुलेआम भाजपच्या समर्थनार्थ उतरल्याचे दिसून येऊ लागले आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी शिवसेना सदस्यांनी सभात्याग केल्याने ठराव मंजूर झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र भुजबळ शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असून शिवसेना सदस्य सभागृहातच होते, असे सांगत शिवसेना नेते रामदास कदम यांनी भुजबळांवर पलटवार केला.

राज्यात शरद पवार यांच्याइतका चतुर राजकारणी कोणी नाही असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांचीही कसबी राजकारणी अशी आेळख आहे. त्याचाच प्रत्यय बुधवारी आला. भाजपने विश्वासदर्शक ठरावाची परीक्षा आवाजी मतदानाने पास केल्यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेलाच यासाठी जबाबदार धरले.

भुजबळ म्हणाले, मतविभागणी होऊन विश्वासदर्शक ठराव पास झाला असता तर चांगले झाले असते, परंतु आवाजी मतदानाच्या वेळी शिवसेनेच्या आमदारांनी सभात्याग केल्याने या प्रक्रियेत भाजप सरकार तरले. शिवसेनेचा सभात्याग हा अभ्यासाचा विषय असल्याचे सांगत भुजबळ यांनी भाजपच्या विजयात एक प्रकारे शिवसेनेचा हात असल्याचेच समोर आणण्याचा प्रयत्न केला.

सर्व आमदार सभागृहातच: कदम
भुजबळ यांच्या आरोपानंतर शिवसेना नेते प्रचंड नाराज झाले असल्याचे दिसून आले. रामदास कदम यांनी भुजबळ यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना सांिगतले, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी शिवसेनेचा एकही आमदार सभागृहाबाहेर नव्हता. भुजबळ विश्वासमताचे खापर मुद्दाम शिवसेनेवर फोडतायत. विराेधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनीही आराेपाचे खंडन केले.