आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळपुत्राच्या जागी विधानसभेला नवा चेहरा; अजित पवार यांची सावध खेळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ स्वत:साठी अधिक सुरक्षित मतदारसंघ शोधत असतानाच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव या मतदारसंघातून पंकज भुजबळांऐवजी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. गजानन देसाई यांना उमेदवारी देण्याचा विचार पक्ष पातळीवर सुरू आहे. पंकज यांच्या विजयाची खात्री नसल्याने आणि छगन भुजबळ यांच्याबद्दल शिवसेना प्रवेशाच्या वावड्या उठत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी योजलेली ही सावध खेळी असल्याचे मानले जात आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे पुत्र पंकज यांनी नांदगाव ऐवजी सुरक्षित मतदारसंघ शोधणे सुरू केले आहे. या मतदारसंघाऐवजी नाशिक मध्य हा मतदारसंघ मिळावा, असे प्रयत्न भुजबळ यांच्यातर्फे केले जात आहेत. नांदगाव काँग्रेसला देऊन त्याबदल्यात नाशिक मध्य राष्ट्रवादीसाठी मागण्याचा प्रस्तावही भुजबळांकडून मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यांचे विश्वासू शिलेदार एकामागोमाग एक असे शिवसेनेत जात आहेत. त्यामुळे भुजबळांच्या मनातही शिवसेनेत परतण्याचे विचार तर सुरू नाहीत ना ?, अशी पक्षाला शंका वाटत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ कुटुंब शिवसेनेत गेले तर उमेदवार शोधताना दमछाक होईल, हे लक्षात घेऊन अजित पवारांनी पर्याय तयार करून ठेवण्याचे डावपेच आखले आहेत. त्यानुसार नांदगावमधून डॉ. देसाई यांना उमेदवारी देण्याची योजना आखण्यात आली आहे. देसाई हे शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात.

नांदगाव मतदारसंघातील मतदार विशेषत: मराठा समाज भुजबळांवर नाराज असल्याने घराणेशाहीचा आरोप टाळण्यासाठी मराठा समाजातील डॉ. देसाईंसारखा नवा चेहरा देण्याबाबत राष्ट्रवादी विचार करत आहे. पक्षर्शेष्ठींकडून उमेदवारीचे संकेत मिळाल्यानंतर या मतदारसंघातील लोकांशी देसाई यांनी संपर्क वाढवण्यास सुरूवात केली आहे.

या मतदारसंघातील सर्वपक्षीय संरपंच आणि स्थानिक नेत्यांचे एक शिष्टमंडळ अजित पवारांना भेटून डॉ. देसाई यांना उमेदवारी देण्याची मागणी करणार आहे. लोकसभेनंतर लगेच कुटुंबातील आणखी एका सदस्याच्या पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी छगन भुजबळ स्वत:ही नांदगाव मतदारसंघाबाबत आग्रही राहणार नसल्याचे कळते.

कोण आहेत डॉ. देसाई
देसाई हे मूळ मालेगाव तालुक्यातील कवळाण या गावाचे रहिवासी असून महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्म याच गावात झाला होता. पूर्वी काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून ते गेली तीन दशकांहून अधिक काळ राजकारणात आहेत. देसाई यांची शेती याच परिसरातील असून मोठय़ा प्रमाणावर नातेसंबंध आहेत. दोन्ही पक्षांच्या मुख्यालयात महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केल्याने राज्यभर पक्ष कार्यकर्ते, नेते आणि सामान्य लोकांत उत्तम जनसंपर्क आहे. स्वत: उच्च विद्याविभूषित असून एमएससीनंतर त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध केईएम हॉस्पिटलमधून मेडिकल बायोकेमिस्ट्रीमधून पीएचडी केली. मीरा भाईंदरमध्ये नगरसवेक आणि आरोग्य सभापती म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले आहे. या भागासाठी 50 एमएलडी पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्याची अंमलबजावणी करवून घेणारे नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे.

नांदगाव मतदारसंघालाही दुष्काळमुक्त करण्याचे माझे स्वप्न आहे, अशा शब्दांत देसाई यांनी आपण उमेदवारी मागणार असल्याचे सांगितले. शरद पवारांनी पुरंदर तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी राबवलेली जानसईसारखी योजना, शिरपूर येथे सुरेश खानापूरकर यांनी केलेले प्रयोग, अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांनी केलेले जलसंधारणाचे प्रयोग यांची प्रेरणा व अनुकरण करू न आपण मतदारसंघातील पाणीटंचाई दूर करू , असा दावाही त्यांनी केला.
गिरणा उजवा कालव्याचा विस्तार निमगावपर्यंत करण्यासाठी प्रयत्न करू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.