आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- ‘सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना मफलरीनेच आवळावे वाटते.’ राज ठाकरे यांच्या या धमकीवजा वक्तव्याने भुजबळ व राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी खुद्द भुजबळांनीच याबाबत काळजी व्यक्त केली होती, त्यापाठोपाठ मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनीही भुजबळांच्या जीविताबाबत चिंता व्यक्त केली आहे.
रविवारी पुण्यात राज यांनी भुजबळ यांच्यावरील राग प्रकट केला होता. त्यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, राज यांच्या धमकीनंतर स्वत: भुजबळांनीही भीती व्यक्त केली आहे. रमेश किणी हत्या प्रकरणाची आपल्याला आठवण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळेच आता आम्हाला भुजबळांची काळजी वाटायला लागली आहे.
टोलसंबंधी सरकार सध्या गांभीर्याने विचार करत असून चुकीच्या पद्धतीने जेथे टोल सुरू आहेत ते बंद करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, आंदोलनाच्या माध्यमातून कायदा हाती घेणार्यांना सरकारने वठणीवर आणावे, असेही जाधव यांनी ठणकावले. ‘सध्या कोणीही उठतो आणि आंदोलन करतो. मात्र, कायदा हाती घेणार्यांची सरकारने अजिबात गय करता कामा नये. त्यांना कायदा दाखवून द्यावा,’ अशी सूचनाही जाधव यांनी राज्य सरकारला केली.
मुंडेंनी प्रकृती तपासावी
भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांना जळी-स्थळी शरद पवार दिसतात. कुठेही आणि कधीही ते फक्त पवारांवर टीका करताना दिसत आहेत. मुंडेंचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ते पवारांबद्दल वाटेल ते बडबडत फिरताना दिसतात. त्यांनी आपली प्रकृती तपासून घेतली पाहिजे, असा टोलाही जाधव यांनी मारला.
दुपदरी मार्गावरील टोल बंद करा : जाधव
राज्यातील दुपदरी महामार्ग आणि पुलांवरील टोल वसुली पूर्णपणे थांबवण्याची मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही पाठवले आहे. ग्रामीण भागात दळणवळणाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी दुपदरी महामार्ग आणि पुलांची गरज आहे. त्यामुळे अशा ठिकाणी टोल आकारणी झाल्यास ग्रामीण जनतेवर बोजा पडणार असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.