आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांचे सर्मथक शिवसेनेच्या वाटेवर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभेतील पराभवानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फारसे भविष्य उरले नसल्याचे लक्षात येताच त्यांचे खंदे शिलेदार व सहकार्‍यांमध्ये अस्वस्थता आहे. यातून सुटका करून घेण्यासाठी भुजबळांचे निकटवर्तीय आता दुसर्‍या पक्षांचा विचार करू लागले आहेत. यापैकी एक असलेल्या नागपूरच्या किशोर कान्हेरे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

भुजबळांच्या अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे कान्हेरे यांच्याकडे विदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारी कंत्राटे, नियुक्त्या, बदल्या अशा सर्व कामांची सूत्रे आहेत. भुजबळांचा विदर्भातील ते उजवा हात समजले जातात. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात झळकणार्‍या जाहिरातीत भुजबळांसोबत कान्हेरे यांची छायाचित्रे लक्ष वेधणारी ठरली होती. विदर्भातील सार्वजनिक बांधकामांसंबंधी एकही फाइल कान्हेरे यांच्या परवानगीशिवाय हलत नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.

ओबीसी चळवळ, भुजबळांच्या समता परिषदेचे काम विदर्भाच्या कानाकोपर्‍यात नेण्याचे काम कान्हेरे यांनी केले. या कामाने कान्हेरे यांनी भुजबळांचा विश्वास संपादन केला. एक तपाहून अधिक काळ ते कायम भुजबळांसोबत सावलीसारखे राहिले. मात्र सध्याची बदलती राजकीय परिस्थिती पाहता आपल्या भविष्याची त्यांना काळजी वाटू लागली आहे. मंगळवारीच ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार होते. मात्र काही कारणामुळे हा पक्षप्रवेश पुढील आठवड्यात होणार आहे.

भुजबळांची मूकसंमती!
कान्हेरेंच्या शिवसेनेला प्रवेशाला भुजबळांची मूकसंमती असल्याची सूत्रांची माहिती आहे. भुजबळांना आपल्या राजकीय भविष्याची कुणकुण लागली असल्याने आपल्या निष्ठावंत सहकार्‍यांचे ते दुसर्‍या पक्षांमध्ये पुनर्वसन करत असल्याचे बोलले जाते. लवकरच भुजबळ यांचे आणखी काही जवळचे सहकारी राष्ट्रवादी सोडून दुसर्‍या पक्षात दाखल होतील, अशी चर्चा आहे.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)