मुंबई - राज्यात सी-प्लेन सेवा सुरू करण्याची सर्व तयारी सुरु झाली आहे. नरिमन पॉइंट येथील समुद्रात प्लेन उतरवण्याची परवानगी बीपीटीने दिली आहे. पावसात सी प्लेन चालवणे योग्य नसल्याने पावसाळ्यानंतर सी प्लेन सेवा राज्यात सुरळीत सुरु होईल, अशी माहिती पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. फेब्रुवारीमध्ये पत्रकार परिषद घेऊन मुंबई ते अॅम्बी व्हॅली सी प्लेन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती, परंतु सहारा समूहाने सी प्लेन उतरवण्यास परवानगी न दिल्याने ही सेवा सुरू होऊ शकली नव्हती. याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता, त्यांनी सांगितले, काही समस्या होत्या. त्या आता दूर झालेल्या आहेत. मुळा, पवना धरणात सी प्लेन उतरवण्यात येणार आहे. ऑक्टोबरपासून ही सेवा राज्यात नियमित सुरु होईल.
न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर येथे आयोजित करण्यात येणा-या दुस-या महाराष्ट्र दिवाळी कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी एमटीडीसीतर्फे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाबद्दल भुजबळ यांनी सांगितले, गेल्या वर्षी प्रथमच न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये महाराष्ट्र दिवाळी कार्यक्रम घेण्यात आला. यात विदेशी नागरिकांना महाराष्ट्रीयन संंस्कृती, परंपरांची माहिती परदेशी नागरिकांना देण्यात आली होती. देशात वाढलेल्या परदेशी पर्यटकांच्या संख्येपैकी 30 टक्के पर्यटक राज्यात आले होते. हा प्रतिसाद पाहूनच यंदाही 20 सप्टेंबर रोजी टाइम्स स्क्वेअर येथे महाराष्ट्र दिवाळी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्याच्या आयोजनासाठी तीन कोटी रुपये खर्च येणार असून काही रक्कम प्रायोजकांमार्फत उभी केली जाणार आहे.